रिलॅक्स व्हायचंय? जाणून घ्‍या विश्रांती घेण्‍याची शास्त्रशुद्ध पद्धत

रिलॅक्स व्हायचंय? जाणून घ्‍या विश्रांती घेण्‍याची शास्त्रशुद्ध पद्धत

हल्ली अनेकजण तणावग्रस्त दिसतात आणि त्यातील बरेच जण तणावमुक्तीचे मार्ग शोधण्यासाठी धडपडताना दिसतात.  (Relaxation techniques)  या पार्श्वभूमीवर, एक अगदी सोपा, कुणालाही मन लावून करता येईल असा विश्रांतीतून तणावमुक्तीचा मार्ग अवलंबून पाहता येईल.

Relaxation techniques : शांतपणे ताणतणावाशी दोन हात करणं अपरिहार्य

आजच्या धावपळीच्या जगात तग धरून रहायचं असेल, तर शांतपणे ताणतणावाशी दोन हात करणं अपरिहार्य ठरतं. आपल्यातले काहीजण या मुकाबल्यात यशस्वी होतात. काही मंडळी मात्र ताणतणावाशी दोन हात करण्याचे कुठलेच मार्ग न मिळाल्याने सचिंत, ताणग्रस्त असल्याचेच जाणवते. अशा व्यक्तींपुढे मग उच्च रक्तदाब, अस्वस्थता, चिडचिडेपणा, उतावळेपणा अशा त्रासांना, तक्रारींना भिडायची वेळ येते. ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा ताणतणावांना चार हात दूरच ठेवण्यासाठी एक साधासोपा उपाय खरं तर ही मंडळी अमलात आणून पाहू शकतात.

Relaxation techniques : विश्रांती घेण्याची शास्त्रशुद्ध पद्धत…

आपल्या शरीराचे स्नायू शिथिल सोडून विश्रांती घेण्याची ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. ज्यांनी अजूनपर्यंत ताण कमी करण्याच्या द़ृष्टीने काही प्रयत्न केलेले नाहीत, त्यांनी या पद्धतीपासून सुरुवात करायला हरकत नाही. याला कुठलीही साधनसामग्री लागत नाही आणि तणावमुक्तीची, शरीर-मनाला विश्रांती मिळवण्याची ही पद्धत कुठेही करण्याजोगी आणि सोपी आहे. त्यामुळे ती करून पाहायला कुणाची काय हरकत असावी? ही पद्धत टप्प्याटप्प्याने समजून घेऊया!

  • सगळ्यात आधी तुलनेने शांत जागा शोधा.
  • चष्मा, चपला/बूट, घड्याळ इत्यादी काढून ठेवा.
  • आता पाठीवर झोपा. दोन पायामध्ये थोडे अंतर ठेवा. हळूहळू डोळे मिटा.
  • पाचपर्यंत सावकाश अंक मोजत खोल श्वास घ्या. पाच अंक मोजत श्वास हळूहळू सोडा. हे सर्व चार-पाच वेळा परत परत करा
  • स्वत:च स्वत:ला 'विश्रांती घे' असं सांगा किंवा 'जाऊ दे' असं सांगा. सावकाशीने आणि पुन्हा पुन्हा सांगत राहा.
  • ही सर्व क्रिया लक्ष केंद्रित करून करा म्हणजे तुमचा तुम्हालाच शांतपणाचा अनुभव मिळेल.
  • आता पायाच्या अंगठ्याकडून सुरुवात करून डोक्याच्या दिशेनं हळूहळू प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करून पुन्हा शिथिलीकरणास हळूहळू सुरुवात करा.
  • प्रत्येक अवयवाचे स्नायू आधी घट्ट करून मग हळूहळू शिथिल करा. हे सर्व खोल श्वास घेऊन करा. परत शिथिल अवस्थेत या.
  • हे शैथिल्य पूर्णपणे अनुभवा. मगच, शरीराची अवस्था बदला. घाई करू नका. हा शिथिलीकरणाचा व्यायाम नेमाने, सावकाश आणि चित्त स्थिर ठेवून, मन एकाग्र करून केल्यास तुम्हाला खर्‍याखुर्‍या शांतीचा, तणावमुक्तीचा आणि विश्रांतीचा अनुभव मिळेल.

डॉ. संतोष काळे

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news