नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संसरी गावातील दोनवर्षीय चिमुकलीचा शनिवारी (दि. १३) मध्यरात्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आम्हाला गावात येण्यास बंदी घातल्याचा आरोप चिमुकलीच्या आई व आजीने करत मृतदेह थेट पोलिस आयुक्तालयात आणला. पोलिसांनी नातलगांची समजूत काढून त्यांना संसरी गावात पाठवले आणि चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित चिमुकलीचा पिता जिवे मारण्याच्या गुन्हा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे.
बुधवारी (दि. १७) रात्री संसरी गावात वाहन उभे करण्यावरून दोन गटांत वाद झाले होते. हाणामारीत जमावाच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याच्या नातलगाच्या फिर्यादीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जमावाविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करीत संशयितांना पकडले. दरम्यान,या गुन्ह्यातील संशयिताच्या दोनवर्षीय मुलीवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातलगांनी मृतदेह घरी नेणे अपेक्षित असताना तिचा मृतदेह रुग्णवाहिकेसह पोलिस आयुक्तालयाबाहेर आणला. नातलगांनी केलेल्या आरोपानुसार, मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी परस्परविरोधी फिर्याद न घेता आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच गावकऱ्यांनी आम्हाला गावात प्रवेश दिला नाही, आमच्या घराला कुलूप लावले. त्यामुळे अन्याय झाल्याची भावना त्यांनी पोलिसांकडे बोलून दाखवली. वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ, सरकारवाडाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी नातलगांची समजूत काढली. अंत्यसंस्कारासाठी पोलिस बंदोबस्त देण्याचे तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर नातलगांनी मृतदेहासह संसरी गावात जाऊन चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले.
नातलगांनी सकाळी 7 ला फोन करून चिमुकलीच्या वडिलांना अंत्यसंस्कारासाठी आणण्याची विनंती केली होती. त्यानुसार ठिकाण व वेळ सांगा, तेथे त्यास आणले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर त्यांनी संपर्क साधला नाही. दरम्यान, चिमुकलीवर अंत्यसंस्कार शांततेत झाले आहेत. कोणीही विरोध केलेला नाही. तसेच घराला मालकानेच लावलेले कुलूप आहे व मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. -संजय पिसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, देवळाली कॅम्प, पोलिस ठाणे.