कोल्हापूर : अवघे शहर राममय; आज शोभायात्रा | पुढारी

कोल्हापूर : अवघे शहर राममय; आज शोभायात्रा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अयोध्येत सोमवारी (दि. 22) होणार्‍या श्री रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात श्रीराम नामाचा जयघोष सुरू आहे. ठिकठिकाणी उभारलेल्या श्रीरामाच्या प्रतिकृती, पताका, सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहर राममय बनले आहे. रविवारी दुपारी बिंदू चौकातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी दसरा चौकात मुख्य सोहळा रंगणार आहे.

दसरा चौकात मुख्य सोहळा होत असून, रामचंद्र साम्राज्य पट्टाभिषेक, महासंकल्प, श्रीगणपती पूजन, पुण्याहवाचन, रामभद्र मंडल स्थापन, श्रीराम महापूजा यानंतर श्रीराम तारक महायज्ञ पूर्णाहुती असे धार्मिक विधी होणार आहेत. पंचगंगा नदीघाटावर आरती, राजाराम बंधारा येथे होमहवन करण्यात येणार आहे. रात्री 7 वाजता महाआरती, आतषबाजी व गीत रामायण असे कार्यक्रम दसरा चौकात होणार आहेत.

रामचंद्र साम्राज्य पट्टाभिषेक विधी

अयोध्येत साकारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा आनंदोत्सव कोल्हापुरात साजरा होत आहे. 22 जानेवारीला सकाळी 9 ते 1 या वेळेत वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र साम—ाज्य पट्टाभिषेक विधी होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात बर्‍याच वर्षांनी हा विधी होत आहे. श्रीरामचंद्रांना पट्टाभिषेक (राज्याभिषेक) हा महत्त्वाच्या विधीचा भाग येतो. यात समुद्राचे, सर्व महानद्यांचे व सर्व तीर्थांचे पवित्र जल, सप्तधान्य, सर्वौषधी, रत्नजल, पंचामृत, फलोदक, सुवर्णजल व विशिष्ट मंत्रसूक्तांनी श्रीरामाला अभिषेक घातला जाणार आहे. आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आल्याचे पत्रकाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

राजाराम बंधारा येथे हवन

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त कसबा बावडा येथील राजाराम बंधारा परिसरातील दत्त मंदिर घाटावर हवन करण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 वेळेत हा विधी होणार आहे.

Back to top button