Rebellion in Shiv Sena : पक्षानं इतकं दिलं… तरीही?… मराठवाड्यातील शिवसैनिकांची भावना

Rebellion in Shiv Sena :  पक्षानं इतकं दिलं… तरीही?… मराठवाड्यातील शिवसैनिकांची भावना

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल सहा आमदार सूरतमध्ये गेल्याची बातमी धडकताच औरंगाबादेत खळबळ उडाली. ( Rebellion in Shiv Sena )  ज्या पक्षाने भरभरून दिलं, त्याच्याशी कोणी प्रतारणा कशी करू शकतो, अशीच भावना मराठवाड्यामधील शिवसैनिकांमध्‍ये आहे.

विधान परिषद निवडणुकीमुळे सर्व आमदारांनी आपले मोबाईल फोन बंद करून ठेवावेत, असा पक्षाचा आदेशच असल्यामुळे या आमदारांचे फोन बंद असावेत, शिवसेनेच्या बैठकीतील आमदारांच्या उपस्थितीवरूनच नेमका निष्कर्ष काढता येईल, असे निष्ठावान शिवसैनिकांना वाटते. या सहापैकी सिल्‍लोडचे अब्दुल सत्तार वगळता सर्वच निष्ठावंत शिवसैनिक आहेत. सत्तार हे अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत.

Rebellion in Shiv Sena : एकनाथ शिंदेचा निर्णयावर कट्टर शिवसैनिक नाराज

मुंबई-ठाण्यानंतर औरंगाबाद हाच ३० वर्षांपासून शिवसेनेचा गड आहे. केवळ महापालिकाच नव्हे तर, जिल्ह्यातील अनेक नगर पालिका, ग्राम पंचायती, नगर पंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीपूर्वी शिवसेनेची सत्ता होती. अर्थात, हे सर्व लोकप्रतिनिधी भाजपशी युती असताना निवडून आलेले. त्यामुळे भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांशी जवळीक करण्याचा पक्ष नेत्यांचा निर्णय अनेक कट्टर शिवसैनिकांना पटलेला नाही.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात दबक्या आवाजात शिवसैनिक आपली नाराजी व्यक्‍तही करीत होते. ज्यांच्याशी कित्येक वर्षे संघर्ष केला, त्यांच्याशीच पक्षाने जवळीक केल्यामुळे शिवसैनिक अक्षरश: भांबावून गेले होते. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जे गेले, ते आमदारही याच मानसिकतेत आहेत. एकूण 35 आमदार शिंदे यांच्यासमवेत आहेत, असे मानले जाते. शिवसेना ही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या दावणीला बांधली गेल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे बंड अनपेक्षित नाही. शिवसैनिकांमधील खदखदच त्यांच्या रूपाने बाहेर पडली आहे.

शिंदे यांच्‍यासोबत सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्‍ह्यातील, निष्‍ठावंताना धक्‍का

राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला दिलेला धक्‍का, विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पाचवा उमेदवार निवडून येणे या घटनाही असंतुष्टांच्या हालचाली वाढण्यास कारणीभूत आहेत. शिंदे यांच्यासमवेत सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत, म्हणूनच निष्ठावंतांना धक्‍का बसला आहे. पक्षाने इतके दिले तरीही हे आमदार बंडखोरी कशी करू शकतात, असा त्यांचा सवाल आहे.

नॉट रीचेबल आमदार
संदीपान भुमरे (रोहयो मंत्री) पैठण
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) सिल्‍लोड
रमेश बोरनारे वैजापूर
प्रदीप जैस्वाल औरंगाबाद मध्य
संजय शिरसाठ औरंगाबाद पश्‍चिम
उदयसिंह राजपूत कन्‍नड

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news