योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता! : नारायण राणे | पुढारी

योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता! : नारायण राणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता!, असे खळबळजनक ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर केले आहे. राणे यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे यांच्यामध्ये मतभेद असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. आता नारायण राणे यांनी पुन्हा दिघेंचा उल्लेख करून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काल रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या २९ समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट झाले नसले तरी जवळपास २९ आमदार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सध्या संजय रायमुलकर, संजय गायकवाड, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, महेंद्र दळवी, शहाजी बापू पाटील, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, प्रदीप जयस्वाल या शिवसेना आमदारांचे फोन नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या दुपारी होणाऱ्या बैठकीमध्ये किती आमदार उपस्थित राहतात हे स्पष्ट होईल.

हेही वाचलंत का ? 

Back to top button