Parliament Security Breach : “त्याला मिलट्रीत भरती व्हायचं होतं…” : संसद घुसखाेरी प्रकरणातील अमाेलच्‍या आई-वडिलांचा आक्राेश

Parliament Security Breach : “त्याला मिलट्रीत भरती व्हायचं होतं…” : संसद घुसखाेरी प्रकरणातील अमाेलच्‍या आई-वडिलांचा आक्राेश

 शहाजी पवार, संग्राम वाघमारे : लातूर

"घर ते मजुरीसाठी लोकाचं शेत अन् लोकाच शेत ते घर, असाच आमचा रोजचा दिवस. पोटासाठी राब, राब राबणं एवडच आमाला माहित. गणगोताच्या सुखदुखाशिवाय आम्ही दोगानबी गाव सोडलं. कुठं गेलो नाही… आलो नाही. अमोल शिकला. त्याला मिलट्रीत भरती व्हायचं होतं. भरतीसाठी म्हणून दिल्लीला जातो एवडचं सांगून तो चार दिवासाआदी गेला. आज गावातल्या लोकानीच त्यानं अस केल्याच सांगितलं. आम्हाला काही सुधरना… आता काय करावं सायब…?" डबडबल्या डोळ्यांनी अमोल शिंदेचे आई-वडिल अंत:करणातला कल्लोळ 'दै.पुढारी'ला सांगत होते. (Parliament Security Breach)

संबंधित बातम्या : 

बुधवारी (दि.१४) संसदेत चाकूर तालुक्यातील झरी (बु.) च्या अमोल शिंदेने घुसखोरी केल्याचे कळताच पोलिसांची पथके आणि पत्रकारांचे ताफे या अडवळणाला असलेल्या गावांकडे मार्गस्थ झाले. ते तिथे पोहचेपर्यंत अमोलच्या आई-वडिलांना आपल्या मुलाने असे काही केल्याचे माहित नव्हते. आई बिचारी घरकामात तर वडिल नेहमीप्रमाणे खंडोबाच्या मंदीराची झाडलोट करुन कपाळावर भंडारा लावून अन् त्याला हातजोडून घरी आले होते. घटकाभरानंतर जेवण करावं असा ते विचार करत असतानाच पोलिस दारात आले अन् त्यांच्या काळजात धस्स झालं. त्यांच अवसान गळाल. गावकरी ही जमले होते. काहीच कळेना.

पोटासाठी राबणाऱ्या या श्रमीकांना दिल्ली संसद, गॅलरी, स्मोक कॅन्डल, निदर्शनं हे सारं अपरिचीत होतं. जीवनात प्रथमच घराभोवतीचा हा अनपेक्षीत गराडा पाहून ते पुरते भांबावले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून अनेकांना गलबलून येत होत. आपला अमोल असं काही करेल अन् आपणाला अशा चौकशीला सामोरं जावं लागेल हे त्यांना कधी वाटलही नसेल. त्यांन काय केलं? कस केलं ? कशासाठी केलं? याची उत्तर त्यांच्यापाशी नव्हती. परंतु तेच प्रश्न त्यांच्या नशिबी आले होते. (Parliament Security Breach)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news