पुढारी ऑनलाईन डेस्क : रविचंद्रन अश्विनने (ravichandran ashwin) अलीकडेच एका मुलाखतीत माजी प्रशिक्षक रवि शस्त्री (ravi shastri) यांच्यावर निशाणा साधला होता. शस्त्री यांच्या एका वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करून अश्विनने मोठा खुलासा केला होता. आता रवी शास्त्री यांनी अश्विनवर पलटवार केला असून खोचक प्रतिक्रिया दिली.
'2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या विधानाने मी खचलो होतो. त्यावेळी माझ्या मनात निवृत्तीचे विचार घोळत होते,' असा खुलासा भारताचा प्रमुख फिरकीपटू आर. अश्विन याने केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री (ravi shastri) म्हणाले की, कुलदीपबद्दलच्या माझ्या वक्तव्यामुळे अश्विन दुखावला गेला असेल तर मी ते विधान केल्याचा मला आनंद आहे. यातूनच अश्विनला काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळाली. ही बाब उल्लेखनीय आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाच्या टोस्टवर लोणी घालणे हे माझे काम नाही. कोणत्याही अजेंडाशिवाय वस्तुस्थिती मांडणे हे माझे काम होते, असाही टोला त्यांनी अश्विनला लगावला.
त्या दौर्यातील अखेरचा सामना सिडनीत खेळवला गेला आणि त्यात कुलदीप यादवने पाच विकेटस् घेत यजमानांना बॅकफूटवर फेकले होते. त्यानंतर रवी शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती.
रवी शास्त्री (ravi shastri) म्हणाले होते की, 'कुलदीप परदेशात कसोटी क्रिकेट खेळलाय आणि त्याने पाच विकेटस् घेतल्या. तो आता परदेशात भारताचा प्रमुख फिरकीपटू बनला आहे. पुढेही जेव्हा आम्हाला एकाच फिरकीपटूसह मैदानात उतरावे लागले, तर तोच आमची पहिली निवड असेल. कदाचित इतरांना संधी मिळू शकते (अश्विनचे नाव न घेता). परंतु आता कुलदीप हाच टीम इंडियाचा नंबर वन कसोटी फिरकीपटू आहे,' असे शास्त्री म्हणाले होते.
दरम्यान, कपिल देव यांचा कसोटी क्रिकेटमधील 434 विकेटस्चा विक्रम तोडण्यासाठी अश्विनला केवळ 8 बळी टिपायचे आहेत आणि तो भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेटस् घेणारा दुसरा गोलंदाज बनेल. असे असतानाही 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यातील रवी शास्त्रींच्या त्या विधानाने मनात नैराश्य पसरल्याचे अश्विनने सांगितले होते.
त्या दौर्यातील अखेरचा सामना सिडनीत खेळवला गेला आणि त्यात कुलदीप यादवने पाच विकेटस् घेत यजमानांना बॅकफूटवर फेकले होते. त्यानंतर रवी शास्त्री यांनी ते विधान केले. या विधानाने अश्विन खूप दुखावला गेला होता. तो म्हणतो, 'कुलदीप यादवसाठी मी आनंदी होतो. परंतु, शास्त्रींच्या त्या विधानाने माझे खच्चीकरण केले आणि मला असे वाटले की मला बसखाली फेकले आहे.' तो पुढे म्हणाला, 'मी रवी भाईंचा आदर करतो, आपण काही गोष्टी बोलतो आणि त्या मागेही घेतो, हे मी समजू शकतो; पण त्याक्षणी मी खचलो होतो. त्यांच्या विधानानंतर मला बसखाली फेकले आहे असे वाटले आणि मनात अशी कालवाकालव सुरू असताना सहकार्याच्या आनंदात मी कसा सहभागी होऊ? मी रूममध्ये परतलो आणि पत्नीशी याविषयी बोललो. त्यानंतरही मी पार्टीत सहभागी झालो. कारण, सरतेशेवटी आम्ही मोठा मालिका विजय मिळवला होता,' असेही त्याने सांगितले होते.
मुलाखती दरम्यान, शास्त्री यांनी विराट कोहली आणि बीसीसीआयमधील वादावरही भाष्य केले. हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे सोडवता आला असता, असे त्यांनी सांगितले. विराटने आपली बाजू मांडली होती, त्यानंतर बोर्डानेही आपली बाजू मांडायला हवी होती. वाटाघाटीने परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती, असे त्यांनी त्यांचे मत मांडले.