Rave Party : ड्रग्जचा बाजार! रेव्ह पार्टी, भरकटलेली कार्टी!

Rave Party : ड्रग्जचा बाजार! रेव्ह पार्टी, भरकटलेली कार्टी!

ठाणे : आजकाल पार्टी हा जणू काही परवलीचा शब्द झाला आहे. त्यातला त्यात महानगरांमधील उच्चभ्रू तरुणाईला रेव्ह पार्टीचा मोह अनावर होताना दिसतो आहे. महानगरांमधील काही ठरावीक हॉटेल्स, महानगरांच्या आसपासच्या निर्जन जागा, एखादे फार्म हाऊस म्हणजे रेव्ह पार्ट्यांचे अड्डे होऊ लागले आहेत; मात्र या रेव्ह पार्ट्यांमुळे केवळ उच्चभ्रू तरुणच नव्हे, तर त्यांच्या साथसंगतीत आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनाही या रेव्ह पार्ट्या भुरळ घालताना दिसत आहेत. हळूहळू हे लोण राज्याच्या ग्रामीण भागातही हातपाय पसरताना दिसत आहे. राज्यासाठी ही निश्चितच धोक्याची घंटा आहे… (Rave Party)

सध्याच्या काळात पार्टी संस्कृती उंबरठा ओलांडून आपल्या घरात शिरू पाहतेय, याचा कुणीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीये. गच्चीवर पार्टी करणारी आपलीच गल्लीतील मुलं कधी रेव्ह पार्टीपर्यंत जाऊन पोहोचतात, हे कळतदेखील नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा हातातून वेळ निघून गेलेली असते. सगळ्यात घातक म्हणजे रेव्ह पार्टीचा प्रकार. रेव्ह पार्टी हा मुख्यत: धनदांडग्या लोकांचा रिकामटेकडा, पण तितकाच खर्चिक उद्योग म्हटलं तर वावगं होणार नाही. रेव्ह पार्टी म्हणजे दारू, नाच-गाणं, ड्रग्ज आणि सेक्स यांचं कॉकटेल असतं.

ड्रग्जचा बाजार!

नवनव्या ड्रग्जच्या प्रकारांच्या जाहिरातीसाठीदेखील या रेव्ह पार्ट्या कुप्रसिद्ध आहेत. एखाद्या ड्रग्ज माफियाने नवा ड्रग्जचा प्रकार मार्केटमध्ये आणला की, त्याचा नमुना अशा पार्ट्यांमध्ये फुकट वाटला जातो. हे ड्रग्ज अत्यंत घातक असतात. नवा ड्रग्जचा प्रकार नमुना म्हणून तरुणांना दिला की, त्याची जाहिरात होते व मागणी वाढू लागते. त्या ड्रग्जला कोड लँग्वेजमध्ये काय म्हणायचं, ते कुठे उपलब्ध होईल व त्याची किंमत काय असणार, या सगळ्या बाबी अशा पार्ट्यांमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. एकप्रकारे रेव्ह पार्टी म्हणजे ड्रग्ज विक्रीचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्मच आहे. पेपरबॉम्ब म्हणजेच एलएसडी पेपर, एमडी, एफेड्रीन, बाटला, क्रिस्टल, एमडीएम, अस्प्रिंन, क्रॅक, हॅश, हुक्का पेन, बच्चू टॅबलेट, कोकेन आदी नवनव्या ड्रग्सची येथे सर्रास विक्री केली जातेय. इतकेच नव्हे, तर कफ सिरफ, व्हाईटनर, डोकेदुखीत वापरण्यात येणारे बाम, पॉवरफुल पेनकिलर आदी औषधींचादेखील नशेसाठी सर्रास वापर करण्यात येतो. या ड्रग्जला म्याव म्याव, पावडर, माल, गोली, पेपरबॉम्ब, अशी वेगवेगळी कोड भाषेतली नावे असतात.

काळा चेहरा जगासमोर!

रेव्ह पार्ट्यांची दुसरी काळी बाजू म्हणजे अश्लीलता व सेक्स रॅकेट. ड्रग्ज घेतल्याने शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते व त्याच नशेच्या आहारी जाऊन या पार्ट्यांमध्ये अश्लीलतेचा बाजार मांडला जातो. उचभ्रू पार्ट्यांमध्ये व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन वाममार्गाला लागलेल्या तरुणींपासून तर अगदी मॉडेल व टीव्ही जगतातील हिरॉईन्सदेखील हजेरी लावतात. त्यातील अनेकजणी या कॉलगर्ल्स म्हणून या पार्ट्यांमध्ये वावरतात. अलिबाग येथे पोलिसांनी मारलेल्या छाप्यातदेखील एक-दोन नव्हे, तर तब्बल सात अभिनेत्री नको त्या अवस्थेत सापडल्या होत्या. या अभिनेत्रींना टीव्ही सीरियलमध्ये काम मिळणे अवघड झाले की, मग त्यांना पैसा मिळेनासा होता. त्यात झगमगत्या दुनियेत सेलिब्रिटी म्हणून लागलेला ब्रँड जपणे गरजेचं होऊन बसतं. गाडी, फ्लॅटचे भाडे, कपडे व इतर खर्च या सार्‍यांवर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च होतात. मग हा खर्च करायचा कसा, असा प्रश्न पडला की, या क्षेत्रातील तरुणींना पहिलाच मार्ग असतो तो हाय प्रोफाईल कॉलगर्ल बनण्याचा. ज्यांना झगमगत्या दुनियेचं व्यसन जडतं ते या गलिच्छ व्यवसायात पाय ठेवतात. कितीतरी ठिकाणी रेव्ह पार्टीवर पडलेल्या पोलिसांच्या छाप्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा काळा चेहरा जगासमोर आला आहे. (Rave Party)

असे होते आयोजन..!

खंडाळा, इगतपुरी, अलिबाग या ठिकाणी रेव्ह पार्ट्यांचे सर्वाधिक आयोजन होते. ठाण्याजवळील येऊरचा परिसर, कासारवडवली येथील खाडी किनारा, मुंबई-पुणे एक्प्रेस वेच्या आजूबाजूला असलेली फार्म होऊसेस, समुद्रात जहाजावर आणि कोकणातील फार्म हाऊसेसवरदेखील रेव्ह पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं. या पार्ट्यांची निमंत्रणे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप व एकमेकांच्या संपर्कानेदेखील कळवली जातात. ही निमंत्रणे खासकरून क्लब मेम्बर्सना पाठवली जातात. अशा क्लबच्या मेम्बर्समध्ये हाय प्रोफाईल कॉल गर्ल, ड्रग्ज माफिया, दलाल यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

लाखोची उलाढाल!

एका रेव्ह पार्टीच्या आयोजनाचा खर्च 25 लाख ते 50 लाखांच्या घरात होतो. हा सगळा खर्च वसूल करण्यासाठी आयोजक या पार्टीत प्रवेशासाठी इन्ट्री फी ठेवतात. ही फी 25 हजार ते 2 लाख व त्यापेक्षा अधिक असते. त्यानंतर या पार्ट्यांत दारू व फूड फ्री देण्यात येतात; पण ड्रग्ज व इतर अश्लील प्रकारावर येथे लाखो रुपये उडवले जातात. (Rave Party)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news