खेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोंडीवली धरणामध्ये सेल्फी काढताना बुडणाऱ्या पुतण्याला वाचविताना चुलत्याचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १) सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. इम्रान याकूब चौगुले (वय ४०, रा. निळीक, ता. खेड) आणि पुतण्या सुहान फैजान चौगुले (वय १०, रा. निळीक, ता. खेड) असे मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, इम्रान चौगुले हा पुतण्या सुहान, मुलगी लाईबा (वय ८) , मुलगा याकूब (वय ४) यांना घेऊन रविवारी सायंकाळी कोंडीवली धरण परिसरात फिरायला गेले होते. यावेळी सुहान हा मोबाईलवर सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरला. यावेळी तो पाय घसरून खोल पाण्यात पडून बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इम्रान चौगुले त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. दरम्यान, यावेळी दोघांचाही बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी खेड पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन बुडालेल्या दोघांचेही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. रात्री नऊ वाजता दोघांचे मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणात काही दिवसांपूर्वी बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी खेडमध्ये कोंडीवली धरणांमध्ये आठ वर्षाच्या मुलासह एका चाळीस वर्षाच्या इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील धरणावर देखरेखीसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होऊ लागली आहे.
हेही वाचलंत का ?