बारामती : बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास | पुढारी

बारामती : बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास

बारामती ; पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीस लग्नाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याच्या खटल्यात किरण अनिल सकट (रा. बारामती) यास येथील विशेष न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  पीडितेला दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दि. ९ जून २०१३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली होती.

पीडित अल्पवयीन मुलगी हातपंपावरून पाण्याचा हंडा घेवून जात असताना सकट याने तिचा विनयभंग केला होता. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सकट याच्या विरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक जी. टी. संकपाळ यांनी या गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. पीडितेने दिलेली साक्ष व जबाब विश्वसनीय असल्याने आरोपीला शिक्षा देण्यास तो पुरेसा असल्याचे ॲड. ओहोळ यांनी सांगितले. तसेच पीडित मुलगी व आरोपी यांनी न्यायालयाबाहेर केलेली तडजोड बेकायदेशीर असल्याचा व केलेला गुन्हा तडजोड पात्र नसल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. न्यायालयाने तो मान्य करत बाललैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व विनयभंग प्रकरणी एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Back to top button