रत्नागिरी : आंबा घाटातील दरीत साखर वाहतूक करणारा ट्रक कोसळला

रत्नागिरी : आंबा घाटातील दरीत साखर वाहतूक करणारा ट्रक कोसळला

साडवली : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील कळकदरा येथे ट्रक सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने या भीषण अपघातातून चालक बालंबाल बचावला आहे. तो जखमी झाला आहे. धीरज जगन्नाथ गाडेकर (वय ३३, रा. करवीर, जि. कोल्हापूर) असे ट्रक चालकाचे नाव आहे. या अपघातात ट्रकचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धीरज (MH09/CA-1491) या ट्रकमधून साखरेची पोती घेऊन कोल्हापूरहून जयगडकडे निघाला होता. ट्रक कळकदरा येथे आला असता ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. याचवेळी ट्रकचालक धीरज याने जीव वाचवण्यासाठी ट्रकबाहेर उडी मारली. उडी मारल्याने तो गडगडत खाली गेला. मात्र, दरीत झाडे असल्याने एका ठिकाणी त्याला झाडाचा आधार मिळाला.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस काँन्स्टेबल तानाजी पाटील यांनी होमगार्ड मंगेश शिंदे यांच्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दरीत अडकलेल्या धीरज गाडेकर याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इतर वाहनचालकांना मदतीला घेवून दोरीच्या सहाय्याने जखमी धीरजला दरीबाहेर काढण्यात आले. व अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातग्रस्त ट्रकमधून साखरेची पोती जयगडकडे नेण्यात येत होती. याची किंमत सुमारे १० लाख रूपये इतकी आहे. अपघात घडल्यानंतर साखरेची पोती ट्रकबाहेर पडून अस्ताव्यस्त पडली होती. काही पोती फुटलीदेखील होती. त्यामुळे साखरेचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे या भीषण अपघातात ट्रकचा अक्षरशः चक्काचुर झाल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास हेड काँन्स्टेबल राहुल गायकवाड करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news