कोल्हापूर : बिद्रीने ‘एफआरपी’ पेक्षा ५०० रुपये जादा दर द्यावा यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

एफआरपी
एफआरपी

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षी बिद्री कारखान्यामार्फत 'एफआरपी' पेक्षा ५०० रुपये उसाला जादा दर मिळावा, या मागणीसाठी बिद्री कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवार (दि. १८ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता मुदाळतिट्टा येथे विरोधी आघाडीमार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एफआरपीपेक्षा पाचशे रुपये ज्यादा मिळालेच पाहिजेत या घोषणांनी परिसर दणाणून गेला. एक तासभर झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूकीची कोंडी प्रचंड प्रमाणात झाली. मुरगुड, कोल्हापूर, राधानगरी या मार्गावर वाहनांच्या लांबच -लांब रांगा लागून राहिल्या होत्या. मुरगूड पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले.

दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामासाठी जाहीर केलेला टनास ३ हजार २०९ रुपये हा ऊस दर कारखाना 'एफआरपी' प्रमाणेच आहे. 'बिद्री'चा सहजीव प्रकल्प कर्जमुक्त झाला असून त्यातून मिळणारा नफा सभासदांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे 'एफआरपी' पेक्षा प्रतिटन ५०० रुपये जादा द्यावा. असे मत माजी संचालक दत्तात्रय उगले यांनी यावेळी व्यक्त केले.

बिद्री प्रशासनाने उसाला जादा दर न देता या एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. मग राज्यात भारी, लय भारी म्हणून त्याची टिमकी वाजवण्याची गरज काय? असा सवाल केला. तर सहवीज प्रकल्पातून ४० कोटीचा नफा झाल्याचे बिद्रीचे अध्यक्ष सांगतात तर हा नफा कुठे गेला?. त्याचाही हिशेब तुम्हाला जनतेला द्यावा लागेल. यावेळी ३५०० च्यावर दर घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. लय भारीची टिमकी वाजवता पण या लयभारीच्या नावाखाली काय चालू आहे हे जनतेने जाणून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी व्यक्त केले. यावेळी अशोक फराकटे, विजय बलुगडे यांची भाषणे झाली.

'गोकुळ'चे संचालक नंदकुमार ढेंगे, माजी संचालक दत्तात्रय उगले, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, बाबा नांदेकर, अरुण जाधव, अशोकराव फराकटे, नंदकुमार सूर्यवंशी, सुभाष पाटील, सुभाष चौगुले, राजेश मोरे, राजू वाडेकर, विश्वनाथ पाटील, राजू मगदूम, धैर्यशील भोसले, सुमित चौगुले, अशोक भांदीगरे, मदन देसाई, तात्या पाटील, बालाजी फराकटे, नंदकुमार पाटील, रंगराव मगदुम, यांच्यासह राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी मानले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news