पारनेर : नागेश्वर मंदिरात अडीच लाखांची चोरी ; चांदीच्या आवरणासह दानपेटीतून ऐवज लंपास | पुढारी

पारनेर : नागेश्वर मंदिरात अडीच लाखांची चोरी ; चांदीच्या आवरणासह दानपेटीतून ऐवज लंपास

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  पारनेरचे ग्रामदैवत श्री. नागेश्वर मंदिरातील पिंड व पार्वतीच्या तांदळ्यावरील सुमारे दहा किलो वजनाच्या अढीच लाख 50 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या आवरण, 21 हजार रोख, दानपेटीतील दोन लाख 51 हजार रुपये, असा ऐवज बुधवारी रात्री साडेदहा ते शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास लांबविण्यात आला. चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चोरट्यांनी ही चोरी केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. गुरुवारी पहाटे सहा वाजता मंदिराचे गुरव योगेश वाघ नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी गेले असता, मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून श्री. नागेश्वराच्या पिंडीवरील, तसेच पार्वतीच्या तांदळ्यावरील चांदीच्या आवरणाची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

वाघ यांनी तातडीने विश्वस्त संजय वाघमारे, शिरीष शेटिया, उदय शेरकर यांना चोरीची माहिती दिली. विश्वस्तांसह पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी तातडीने मंदिराकडे धाव घेतली.यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चोरट्यांचा माग काढण्यासाठी नगर येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने मंदिराच्या पूर्वेला शंभर मीटर अंतरावरील मुख्य रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग काढला. तेथून चोरटे वाहनातून पसार झाले असावेत. सुरक्षेच्या दृष्टिकोने पिंड व तांदळ्याचे आवरण सहा इंच लांबीच्या खिळ्यांसह फरशीमध्ये बसविण्यात आले होते. चोरट्यांनी कटावणी अथवा पहारीने पिंड व तांदळ्याच्या भोवतीची फरशी उचकटून चांदीचे आवरण लांबवले. आवरण काढताना एखाद्या चोरट्याला जखम झाली असावी.

त्यामुळे पिंडीजवळ रक्ताचे डाग आढळले आहेत. न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून रक्तमिश्रित माती, तसेच हातांचे, बोटांचे ठसे जमा केले आहेत. तपासाच्या दृष्टीने इतर काही पुरावे न्यायवैद्यक पथकाने जमा केले आहेत. चोरीचा तातडीने तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पुजारी योगेश वाघ यांनी पारनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलिस निरीक्षक घनश्याम बळप ,सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ,पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र जावळे, हनुमंत उगले व पोलिस कर्मचारी सूरज कदम, देवीदास अकोलकर यांनी घटनास्थळी धाव घेत तपास यंत्रणा राबवत श्वानपथक,न्याय वैद्यक विभाग व ठसे तत्राना पाचारण करून पुढील तपास करीत आहेत.

मंदिरात दुसर्‍यांदा चोरी

सन 2002 मध्ये डॉ. विष्णूमहाराज पारनेरकर व गुणेशमहाराज पारनेरकर यांनी नागेश्वराची पिंड व पार्वतीच्या तांदळ्यासाठी दहा किलो चांदीचे आवरण बनवून दिले होते. सन 2015मध्ये पार्वतीच्या तांदळ्यावरील तीन किलो चांदीच्या आवरणाची चोरी झाली होती. ग्रामस्थांनी पुन्हा नवीन आवरण बसवले. त्या चोरीचा अद्यापि तपास लागला नाही.

तपास न लागल्यास आंदोलन

मंदिरातील चोरीचा तातडीने तपास लावून चोरट्यांना गजाआड करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, विश्वस्त संजय वाघमारे, शिरीष शेटिया, सामाजिक कार्यकर्ते विशाल शिंदे, उदय शेरकर, कल्याण थोरात, रायभान औटी यांनी दिला आहे.

Back to top button