शेवगावकरांचा ‘विकास’ हरवला ! शहराने गमावले, तर नगरसेवकांनी कमावले | पुढारी

शेवगावकरांचा ‘विकास’ हरवला ! शहराने गमावले, तर नगरसेवकांनी कमावले

शेवगाव : सात वर्षांत शेवगाव नगरपरिषेवर 13 मुख्याधिकारी बदलले. अधिकारी बदलाचा हा उच्चांक असून, बदलत्या अधिकार्‍याने शहराचा मात्र, विकास काही झाला नाही. परिणामी शहराने गमविले, तर नगरसेवकांनी कमाविले, असा आरोप नागरिकांतून होत असल्याचे ऐकू येत आहे. शेवगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर ग्रामपंचायत कारभारला विटल्याने शहराच्या सर्वोत्तम विकासासाठी येथे नगरपरिषद स्थापनेची इच्छा 15 जुलै 2015 रोजी नगरपरिषद घोषणेने पूर्ण झाली. त्यामुळे ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरसेवकांचा राज सुरू झाला.

वाढत्या शहराबरोबर वाढत्या अपेक्षा पूर्ण करून, जीवनावश्यक सोई-सुविधेत सुधारणा होईल, पारणे फेडणारा विकास पाहावयास मिळेल, अशी अपेक्षा धरून असणार्‍या शहरवासियांचा भ्रमनिराश होत गेला अन् गड्या अपली ग्रामपंचायतच बरी होती, हा भूतकाळ नजरेसमोर आला. पाच वर्षे सत्तेच्या कालावधीत शहराने विकास गमविण्यात घालविली. सहा दिवसाला सुटणारे पाणी आता दहा दिवसावर आले, गुळगुळीत रस्ते खडबडीत झाले, नाल्यात जाणारे पावसाचे पाणी रस्त्यावर वाहू लागले, अनेक अनाधिकृत भूखंड वस्तींनी व्यापले. सत्तेच्या पाच वर्षाच्या कालावधीत नगरसेवकांनी प्रभागात केलेला विकास होणार्‍या निवडणुकीत समोर येणार आहे. मतदारांना भावलेला व मतदारांना गमावलेला नगरसेवक कोण? याचे चित्र निवडणुकीत स्पष्ट होईलच.

ग्रामसेवक ते मुख्याधिकार्‍यांचा प्रवास

15 ते 22 जुलै 2015 पर्यंत ग्रामसेवक, नंतर 22 जुलै 2015 पासून 9 नोव्हेंबर 2015 पर्यंत नानाभाऊ महानोर येथे प्रशासक होते. पुढे निवडणूक लागल्याने 10 नोव्हेंबर 2015 ते 8 फेब्रुवारी 2016 पर्यंत तहसीलदार दादासाहेब गिते यांनी प्रशासक कार्यभार पाहिला. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2016 पासून 6 नोव्हेंबर 2016 नानाभाऊ महानोर (प्रभारी मुख्याधिकारी) पदी आले. 6 नोव्हेंबरला त्यांचा अधिकार बदलला व 7 नोव्हेंबर 2016 ते 30 मार्च 2017 पर्यंत नितीन कापडणीस (प्रभारी), 31 मे 2017 ते 9 ऑक्टोबर 2017 वसुधा कुरणावळ (प्रभारी), 10 ऑक्टोबर 2017 ते 29 नोव्हेंबर 2017 नानाभाऊ महानोर (प्रभारी), 30 नोव्हेंबर 2017 ते 12 जुन 2018 नितीन कापडणीस (प्रभारी), 13 जुन 2018 ते 14 स्पटेंबर 2021 अंबादास गर्कळ (मुख्याधिकारी), 15 स्पटेंबर 2021 ते 26 स्पटेंबर 2021 अजित निकत (प्रभारी), 27 स्पटेंबर 2021 ते 20 मार्च 2022 संतोष लांडगे (प्रभारी), 21 मार्च 2022 ते 13 स्पटेंबर 2022 ऋषिकेश भालेराव (मुख्याधिकारी), 16 स्पटेंबर 2022 ते 10 ऑक्टोबर 2022 संतोष लांडगे ( प्रभारी ) आता 10 ऑक्टोबरपासून सचिन राऊत यांनी या मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतला आहे.

चार वर्षे नगरपरिषदेवर प्रभारीराज

आलेले आताचे अधिकारी किती दिवसाचे पाहुणे हे कोण जाणे, अशी शंकाही व्यक्त होत आहे. तीन वर्षेे अंबादास गर्कळ यांचा मुख्याधिकारी पदाचा काळ पाहता जवळपास चार वर्षे नगरपरिषदेवर प्रभारी राज राहिले.
10 जानेवारी 2016 मध्ये नगरपरिषदेची पहिली निवडणूक होऊन 10 फेब्रुवारी 2016ला प्रथम नगराध्यक्षांची निवड झाली.
पुढे राजकारण बदलत गेले नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. आडीच वर्षात सत्तांतर झाले. त्यातच अधिकारी-नगरसेवक, असा सतत वाद होत राहिला.

Back to top button