'दारु पिऊन कार चालवली म्हणून काय झालं? आजकाल सर्वांचीच मुलं दारु पितात. थोडी दारु पिल्यामुळे काय बिघडलं, कशासाठी तुम्ही दंड करता, अशी प्रश्नांची सरबत्ती करत राजस्थानमधील महिला आमदाराने
( Rajasthan MLA) थेट पोलिसांचीच हजेरी घेतली. दारु पिवून वाहन चालविणार्या नातेवाईकाची सुटका करण्यासाठी त्यांनी पतीसह थेट पोलिस ठाण्यातच धरणे आंदोलनही केले.
राजस्थानमधील शेरगढ मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार मीना कंवर यांचा नातेवाईक हा मद्यप्राशन करुन कार चालवत होता. पोलिसांना त्याला अडवले. दंड ठोठावत त्याला पोलिस ठाण्यात घेवून गेले. नातेवाईकाने या घटनेची माहिती कंवर यांना दिली. तत्काळ कंवर यांनी पोलिस स्थानकात फोन केला. नातेवाईकाची तत्काळ सुटका करा, अशी मागणी केली. कायदानुसारच कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. या उत्तराने आमदार कंवर याचा राग अनावर झाला. त्या आपल्या पतीसह पोलिस ठाण्यात दाखल झाल्या.
रातानाडा पोलिस ठाण्यात आल्यानंतर आमदार मीना कंवर यांनी पोलिसांनाच सुनावले. अलिकडे सर्वांचीच मुले दारु पितात. दारु पिऊन कार चालवली म्हणून काय झालं?, असा सवालही त्यांनी केला. या प्रश्नाने पोलिस अवाक झाले. नातेवाईकाची पोलिस सुटका करत नाहीत म्हटल्यावर आमदारांनी पतीसह पोलिस ठाण्यात जमीनवर बसून धरणे आंदोलनही केले. पोलिसांनी या घटनेचे चित्रीकरणही केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार मीना कंवर यांनी पोलिसांनाही धमकी दिल्याची चर्चा आता रंगली आहे.