नेवासा : पुढारी वृत्तसेवा : गेल्या जून ते ऑगस्ट दरम्यान पावसात मोठा खंड पडल्याने यंदाचा खरीप हंगाम होईल की नाही, असे संकट आले होते. पण, गणपती बाप्पा पावले आणि गेल्या आठवड्यात नेवासा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, तूर यासह अन्य पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात यावर्षी 28 हजार 967 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. मात्र, आठ महसूल मंडलात जून ते ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडल्याने खरीप हंगामावर दुष्काळाची टांगती तलवार लटकत होती. परंतु, बाप्पा पावल्याने तीन दिवसांत तालुक्यात चांगला पाऊस झाला. तालुक्याच्या आठ महसूल मंडलांत कपाशी बरोबर सोयाबीन तूर या पिकांना पावसात पडलेला खंडामुळे चांगला फटका बसला होता. शेतकरी चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहत होता.
संबंधित बातम्या :
तालुक्यात ऊस शेतीला पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. पाऊस नसल्याने उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पन्न घटणार आहे. मुळा धरणातून आवर्तन सोडण्यास खूप उशीर झाल्याने ऐन मोसमात पिकांना पाणी मिळाले नाही. परंतु, पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तरीही अन्य भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला असल्याने खरीप हंगाम काहीतरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
विमा भरपाई मिळावी
जून ते ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील पीक उत्पन्नात मोठी घट होणार आहे. पाऊस नसल्याने कपाशीची पातेगळ जास्त झाली आहे. उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पीक विमा भरपाई मिळावी, अशी मागणी देडगाव येथील शेतकरी गोरक्षनाथ कुटे यांनी केली आहे.