मागील अनेक वर्षे सातत्याने मागणी होत असूनही प्रलंबित असलेली रेल्वे आरक्षण सेवा अखेर राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. दिनांक ९ ते १५ ऑक्टोबर या राष्ट्रीय टपाल सप्ताहा दरम्यान राजापूर पोस्ट कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचा तालुक्यातील जनतेला चांगलाच फायदा होणार आहे.
संबंधित बातम्या –
दोन दिवसांपुर्वी राजापूरात या सेवेचे उद्घाटन पार पडले होते . जिल्ह्यात यापुर्वी रत्नागिरी हेड ऑफीससह लांजा, संगमेश्वर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षणाची सेवा सुरु करण्यात आली होती. त्याचा त्या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना चांगलाच फायदा होत होता . तथापि, विस्ताराने प्रचंड असलेल्या राजापूर पोस्ट कार्यालयात मात्र ती सेवा देण्यात आली नव्हती. त्यामुळे सातत्याने त्याची मागणी होत होती. पण तो प्रश्न प्रलंबित होता.
कोरे मार्गावर सौंदळ येथील हॉल्ट (थांबा) वगळता विस्ताराने मोठ्या अशा राजापूर तालुक्यासाठी राजापूर रोड हे एकमेव परीपूर्ण स्थानक आहे. या स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने अन्याय होत राहिला आहे. त्यापैकीच एक राजापूर शहर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षणाचा मुद्दा होता. तालुक्यातील एकमेव असलेले राजापूर रोड रेल्वेस्थानक हे राजापूर पासून सुमारे अठरा ते वीस किमी अंतरावर आहे. त्यामुळे अन्य तालुक्यांप्रमाणेच राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुरु करावे अशी मागणी वाढू लागली होती. तसे सातत्याने प्रयत्न देखील सुरु होते पण मुहुर्त काही सापडत नव्हता. मात्र अखेर राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा सुरु करुन तालुकावासीयांना अनोखी भेट मिळाली आहे.
राजापूरकरांच्या कोकण रेल्वेशी संबंधीत मागण्यांपैकी पोस्टातील रेल्वे आरक्षण ही मागणी मार्गी लागली आहे. आता हळुहळु अन्य मागण्यांची पुर्तता कोरे प्रशासनाने करावी, अशी मागणी तालुकावासीय करत आहेत.