शिवजयंती : शंभर गड किल्ल्यांच्या मातीचा संग्रह करणारा ‘अवलिया’

शिवजयंती : शंभर गड किल्ल्यांच्या मातीचा संग्रह करणारा ‘अवलिया’
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती. हीच खरी आपली संपत्ती आहे. याच मातीमुळे मला शिवविचारांवर चालण्याची ताकद, प्रेरणा मिळते, असे मानत शिवभक्त राहुल मारूती नलावडे (रायबा) यांनी नियमित कामातून वेळ काढून गेल्या तीन ते चार वर्षात तब्बल १०० किल्ले सर केले आहेत. तर प्रत्येक किल्ल्यावरची माती आपल्या घरी आणून तिचा संग्रह केला आहे. याबाबत त्यांनी यासंग्रहामुळे माझ्या घरीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची धूळ लागली असल्याची भावना व्यक्त केली आहे.

राहुल नलावडे मुळचे वेल्हे तालुक्यातील. त्यांचा जन्म राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाजेघर या गावी झाला. मावळ भाग असल्यामुळे शिक्षणासाठी ते पुण्यात आले. राजगडाच्या पायथ्याशीच गाव असल्यामुळे लहानपणी गायी-म्हशींना चारायला घेऊन राजगड आणि परिसरात कायमच भटकंती करत होते. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांविषयी एक वेगळीच आपुलकी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुढील फार्मसीचे शिक्षण त्यांनी फलटण, भोर येथे पुर्ण केले. पुण्यात सध्या त्याचे औषधालय (मेडिकल) सुरू आहे. त्याकामातूनच वेळ काढून त्यांनी हा छंद जोपासला आहे. या छंदाचेच फळ म्हणजे, आज त्यांनी शंभर किल्ले सर केले असून त्यावरील शिवरायांच्या पदस्पर्श झालेली माती घरात जतन करून ठेवली आहे. घरातच त्यांनी एका शोकेसच्या लाकडी कपाटात छोट्या-छोट्या डब्यांमध्ये मातीचे जतन केले आहे.

रायबा यांनी सर केलेले निवडक किल्ले

रायबा यांनी गेल्या चार वर्षात राजगड, टेकाई, सिंहगड, कलावंती, रायगड, कोकण दिवा, उंदेरी, चावंड, कर्नाळा, तोरणा, कुलाबा, अजिक्यतारा, केंजळगड, पांडवगड, तिकोना, चांदगिरी, पळसदुर्ग, निमगिरी, पन्हाळा, तुंग, प्रबळगड, पद्मदुर्ग, जंजिरा, प्रतापगड, पावनगड, रोहिडा, चंदन, विशालगड, माहुली, वासोटा, लोहगड, हरिहरगड, रायरेश्वर, अलंग, पुरंदर यांसह अन्य अवघड किल्ले सर करून त्यावरील मातीचा संग्रह केला आहे.

हेही वाचलंत का? 

प्रत्येक किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची गाथा आहे. त्यामुळे हे गड किल्ले हीच खरी मराठी माणसाची संपत्ती आहे. त्यामुळे मी किल्ले भ्रमंती केली आणि मला याचा छंदच लागला. या छंदाच्या अभ्यासातून 'दुर्गराज राजगड' या पुस्तकाची निर्मिती झाली. आणि घरामध्ये १०० किल्ल्यांच्या मातीचा संग्रह जमा झाला आहे. नियमित कामातून हे सर्व करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, कुटूंबियांच्या मिळालेल्या पाठींब्यामुळे हे सर्व शक्य झाले.
– राहूल नलावडे, दुर्ग भ्रमंतीकार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news