गोव्यात अपक्षांचा भाव वधारणार, त्रिशंकू स्थिती उद्भवण्याची शक्यता गोळाबेरजेचे प्रयत्न | पुढारी

गोव्यात अपक्षांचा भाव वधारणार, त्रिशंकू स्थिती उद्भवण्याची शक्यता गोळाबेरजेचे प्रयत्न

पणजी; विलास ओहाळ : राज्यात विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी भाजप किंवा काँग्रेससारख्या विरोधी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचा राजकीय अभ्यासकांचा होरा आहे. तसे झाल्यास राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अपक्षांचा भाव वधारू शकतो.

सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांकडे जावे लागू नये, त्याऐवजी अपक्षांची मदत घेता येईल, यासाठी भाजप आणि काँग्रेसने मतदान झाल्याझाल्याच चाचपणी सुरू केली आहे. यंदा भाजपला बंडखोरीला सामोरे जावे लागले. बंडखोरांनी आपणच बाजी मारणार, असा दावा केला आहे. त्यांचा प्रचार आणि उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून सुरू केलेली निवडणुकीची तयारी पाहता काही ठिकाणी अपक्ष बाजी मारतील, असे चित्र आहे.

अपक्षांमुळे इतर पक्षांचे उमेदवार निवडून येतील, असाही अंदाज वर्तविला जाऊ लागला आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही 22 प्लसचा दावा केला आहे. परंतु, यंदाची निवडणूक ही उमेदवारांच्या कामगिरीवर व त्यांच्या लोकसंपर्कावर अवलंबून आहे. भाजपने जे निवडून येऊ शकतात, त्यांना आपल्याकडे वळविले.

भाजपने 40 जागांवर उमेदवार दिले आहेत, तर काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर युती जाहीर करून 37 जागांवर उमेदवार दिले. फॉरवर्ड पक्षाची कोंडी करीत त्यांना 12 जागांवरून 3 जागांवर लढण्यास भाग पाडले.

मगोपकडे असणार सर्वांचे लक्ष

स्थानिक पक्ष म्हणून ओळख असलेल्या मगोपने म्हणजेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने यावेळी बंगालच्या तृणमूल काँग्रेसबरोबर युती केली. या युतीला किमान सहा ते नऊ जागा मिळण्याची आशा आहे. मगोपचे चारपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले, तर ते युतीला रामराम करून दुसर्‍या पक्षाबरोबर सत्तेतील भागीदार बनण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहू शकतात.

हे अपक्ष मारू शकतात बाजी

प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर, आलेक्स रेजीनाल्ड, सावित्री कवळेकर, दीपक पाऊसकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, विल्फ्रेड डिसा, इजिदोर फर्नांडिस या अपक्ष उमेदवारांची विजयावर प्रबळ दावेदारी मानली जात आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button