मोदींचा अपमान करण्याच्या नादात राहुल गांधींनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला : स्मृती ईराणी

मोदींचा अपमान करण्याच्या नादात राहुल गांधींनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला : स्मृती ईराणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याच्या नादात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. गांधी कुटुंबाकडून दलित अथवा शोषित समाजाचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जेव्हा आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी एक महिला राष्ट्रपती पदावर आली, त्यावेळीही गांधी कुटुंबाच्या निर्देशावरून द्रौपदी मुर्मू यांचा अपमान करण्यात आल्याचे ईराणी यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधानांसाठी अपशब्द वापरले आहेत. गांधी यांनी आरोप केले पण त्याची सत्यता ते सिध्द करु शकले नाहीत. गांधी यांना एका व्यक्तीचा अपमान करण्यासाठी नव्हे तर ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल न्यायालयाने दोषी ठरविले आहे, असे सांगत ईराणी म्हणाल्या की, एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत गांधी यांनी पंतप्रधानांच्या प्रतिमेवर तोवर हल्ला करत राहू, जोवर त्यांची प्रतिमा नष्ट होत नाही, असे सांगितले होते. गांधी कुटुंबाने पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यानुसार प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

राहुल गांधी यांची मानसिक दिवाळखोरी समोर आली आहे. लंडन असो अथवा भारत किंवा संसद आणि संसदेबाहेर देखील ते वारंवार खोटे बोलत आहेत. गांधी यांचे लक्ष्य पंतप्रधान मोदी आहेत. मोदी यांचे लक्ष्य देशाच्या विकासावर आहे, असे ईराणी यांनी नमूद केले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांच्यावरही ईराणी यांनी हल्लाबोल केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news