Defamation Case : मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना हायकोर्टाकडून समन्स | पुढारी

Defamation Case : मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना हायकोर्टाकडून समन्स

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांना मंगळवारी समन्स बजावले. पुढील सुनावणीवेळी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे न्यायालयाने समन्समध्ये म्हटले आहे. १७ एप्रिल रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन हजार कोटी रुपये देऊन शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह खरेदी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी केला होता. यावर शेवाळे यांनी याचिकेत आक्षेप घेतला आहे. भविष्यात अशा प्रकारचे आरोप होऊ नयेत, यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांना समज दिली जावी, अशी विनंतीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सदर प्रकरण राजकीय स्वरुपाचे असल्याने आपण कोणताही आदेश देत नाही, पण उद्धव आणि आदित्य ठाकरे तसेच संजय राऊत यांनी पुढील सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहून भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

गुगल, फेसबूक, इन्स्टाग्राम, टि्वटर आदी सोशल मीडियावर ठाकरे गटातील नेत्यांनी केलेली विधाने अजुनही आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने संबंधित सोशल मीडियाविरोधातही नोटीस बजावली आहे. वादग्रस्त पोस्ट्स का हटविण्यात आलेल्या नाहीत, असे सांगत खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने सोशल मीडियाला दिले आहेत.

हेही वाचा:

Back to top button