Dravid vs Dhawan : हेड कोच राहुल द्रविड यांनी जाणूनबुजून ‘गब्बर’ला दाखवला बाहेरचा रस्ता

Dravid vs Dhawan : हेड कोच राहुल द्रविड यांनी जाणूनबुजून ‘गब्बर’ला दाखवला बाहेरचा रस्ता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाची घोषणा होण्यापूर्वी शिखर धवनला या मालिकेसाठी भारताच्या T20 संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू होती. याला कारणही तसेच होते. IPL च्या 15 व्या हंगामात धवनची बॅट पुन्हा एकदा तळपली. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला संधी मिळेल, असे सर्वांनीच पक्के केले होते. परंतु तसे झाले नाही. कर्णधारपद सोडा, धवनला संघात स्थानही मिळालेले नाही. निवडकर्त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांसह अनेक क्रिकेट तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Dravid vs Dhawan)

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे काही महिने बाकी आहेत. त्यातच धवनचे भारतीय संघात पुनरागमन झालेले नाही, यावरून त्याचे नाव निवडकर्त्यांच्या यादी समाविष्ट नसल्याचे स्पष्ट होते. धवनने आयपीएल 2022 हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना 38.33 च्या सरासरीने 460 धावा केल्या. तो संपूर्ण लीग सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. (Dravid vs Dhawan)

राहुल द्रविडच्या सांगण्यावरून शिखर धवनला संघातून वगळण्यात आले?

दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने कबूल केले की धवनने गेल्या दशकात भारतीय संघाला खूप काही दिले आहे. तथापि, त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये तरुणांना संधी देण्याचे महत्त्वही सांगितले. धवनला बाहेर ठेवण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सांगण्यावरून घेण्यात आला असल्याचे त्या अधिका-याने म्हटले आहे. या निर्णयाची माहिती द्रविड यांनी धवनलाही दिली होती, असेही संबधीत अधिका-याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. (Dravid vs Dhawan)

इनसाईडर स्पोर्टससाठी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याने सांगितले की, 'शिखरने गेल्या दशकापासून भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. परंतु T20 मध्ये तुम्हाला तरुणांना संधी द्यावी लागेल. जे चांगली कामगिरी करत आहेत त्यांचा प्रथम निवडकर्त्यांना विचार करावा लागतो. राहुल द्रविड यांना कठीण निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही सर्वांनी ते मान्य केले. संघ जाहीर होण्यापूर्वीच राहुल द्रविड यांनी शिखरला याची माहिती दिली होती,' असेही त्या अधिका-यांनी म्हटले.

नुकत्याच झालेल्या IPL 2022 च्या हंगामात शानदार कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्यासारखे खेळाडू भारतीय संघात परतले आहेत, तर उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

द. आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ :

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news