Caster Semenya : स्त्रीत्व सिद्ध करायला ‘प्रायव्हेट पार्ट’ही दाखवायला तयार होते, आफ्रिकन धावपटूचा खुलासा | पुढारी

Caster Semenya : स्त्रीत्व सिद्ध करायला ‘प्रायव्हेट पार्ट’ही दाखवायला तयार होते, आफ्रिकन धावपटूचा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणा-या महिला ॲथलिट कॅस्टर सेमेन्या (Caster Semenya) हिने लिंग चाचणीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्रातील लिंग चाचणी पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे. दक्षिण आफ्रिकेची धावपटू सेमेन्या हिने दोन राष्ट्रकुल सुवर्ण आणि तीन जागतिक चॅम्पियनशिप सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे.

सेमेन्या म्हणाली, जेव्हा मी १८ वर्षांची होते तेव्हा मी एक महिला म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ट्रॅक अधिकाऱ्याला माझे प्रायव्हेट पार्ट दाखवण्याचे मान्य केले होते, असे मनोगत मांडत सेमेन्याने थेट अॅथलेटिक्सच्या जागतिक प्रशासकीय समितीवर (world athletics governing body) गंभीर आरोप केला आहे. एचबीओ रिअल स्पोर्ट्स ब्रॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिने हा मोठा खुलासा केला. तिच्या या खुलाशानंतर जागतिक क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली असून जेंडरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Caster Semenya)

स्पर्धेत भाग घेण्यासाठी ॲथलेटिक्सच्या या जागतिक संस्थेद्वारे मला औषधे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. माझा एकप्रकारे त्यांनी छळ केला. मी इतकी घाबरले होते की अखेर त्या संस्थेतील लोकांनी मला हार्ट ॲटॅक येण्याच्या भीतीने सोडून दिले, असेही सेमेन्याने म्हटले आहे. (Caster Semenya)

बर्लिनमध्ये २००९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील एका घटनेचा संदर्भ देताना सेमेन्या म्हणाली, ‘तिथे मी ८०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. तेव्हा मी १८ वर्षांची होते आणि ते माझे पहिले मोठे विजेतेपद होते. पण, माझी कामगिरी आणि शरीरयष्टी लक्षात घेऊन ॲथलेटिक्सच्या प्रशासकीय समितीने मला लिंग चाचणी करण्यास सांगितले. ट्रॅक अधिकाऱ्याला वाटले की मी पुरुष आहे.

सेमेन्या म्हणाली, ‘मी अधिका-यांना स्पष्ट केले की, मी महिलाच आहे. यासाठी मी तुम्हाला माझे प्रायव्हेट पार्ट दाखवू शकते. मी स्त्री असल्याचे सिद्ध करण्यासाठी मला माझे प्रायव्हेट पार्ट दाखवावे लागतील याने मला काही फरक पडणार नाही’, असेही मी ठकावून सांगितले होते.

जागतिक ॲथलेटिक्सने आजपर्यंत औषधाची माहिती दिलेली नाही…

जागतिक विजेतेपद जिंकल्यानंतर, सेमेन्याला आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स फेडरेशनने महिलांशी स्पर्धा करण्यासाठी तिच्यातील उच्च टेस्टोस्टेरॉन कमी करण्यासाठी औषधे घेण्यास भाग पाडले, परंतु जागतिक संस्थेने आजपर्यंत त्या औषधांचा तपशील शेअर केलेला नाही. पण असे मानले जाते की तिने टेस्टोस्टेरॉन कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या असतील.

जागतिक ॲथलेटिक्सच्या वकीलांचा बचाव

दरम्यान, जागतिक ॲथलेटिक्सचे वकील जॉयथन टेलर यांनी औषधाचा बचाव केला, अग्रगण्य तज्ञांनी सांगितले की ते उच्च टेस्टोस्टेरॉनसाठी महिला खेळाडूंना ही औषधे लिहून देतील. याला उत्तर देताना सेमेन्याने सांगितले की, जॉयथान यांची त्याची जीभ कापून फेकून द्यावी.

Back to top button