महाराष्ट्रातील मंत्र्यांना जनतेच्या प्रश्नांचा विसर: आ. विखे

महाराष्ट्रातील मंत्र्यांना जनतेच्या प्रश्नांचा विसर: आ. विखे

शिर्डी : आपले अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते मोर्चे आणि आंदोलने करुन, जनतेचे लक्ष विचलित करीत आहेत. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेले तीन पक्षांचे मंत्री शेतकर्‍यांचे प्रश्न विसरले आहेत. त्यांच्या निष्क्रीयतेमुळेच विकास प्रक्रीयेत राज्य आज पिछाडीवर गेले आहे, असे घणाघाती टीकास्त्र भाजप ज्येष्ठ नेते, आ. राधाकृष्ण विखे पा. यांनी सोडले.

शिर्डी शहरातील सुमारे 11 कोटी 57 लाख रुपयांच्या निधीतून विकसीत होत असलेल्या कामांचे भूमिपुजन, 7 कोटी रुपये खर्चाच्या नॅचरल गॅस लाईनच्या कामाचा प्रारंभ आ. विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरीकांसाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साधन साहित्य व आयुष्यमान भारत योजनेतील नागरीकांना कार्डचे वितरण आ. विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी खा. डॉ.सुजय विखे पा., माजी आ. वैभव पिचड, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, कैलास कोते, अभय शेळके, भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, विजयराव कोते, राजेंद्र कोते, सचिन कोते, मंगेश त्रिभूवन, सुजीत गोंदकर, विलासराव कोते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ.विखे पा. राज्य सरकारच्या धोरणांवर परखड भाष्य केले. ते म्हणाले, राज्य सरकारचा कारभार फक्त भगवान भरोसे सुरु आहे. सर्वकाही केंद्राने द्यावे, ही अपेक्षा बाळगुण सरकार काम करीत आहे. कोविड संकटातही सरकारची हीच बिकट अवस्था होती. केवळ नरेंद्र मोदीजींसारखे पंतप्रधान देशाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच या संकटातून देश वाचू शकला असे सांगत, जगामध्ये इतर देशांची झालेली अवस्था पाहता कोविड संकटातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक निर्णय समाजहिताचा ठरल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

केंद्र सरकारने सामान्य माणसाला केंद्रस्थानी माणून प्रत्येक योजना सुरु केली. केवळ घोषणा नव्हे तर थेट अंमलबजावणी हे केंद्राचे धोरण आहे. त्यामुळेच कोणत्याही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना थेट मिळत आहे. केंद्राच्या धोरणामुळेच कृषी क्षेत्राला दिशा मिळाली असून, शेतकर्‍यांनाही दिलासा मिळल्याचे सांगत आ. विखे पा. म्हणाले. व्यक्तिव्देशाच्या भावनेतून पंतप्रधानांवर टीका करणे एवढाच कार्यक्रम राज्यात सत्ताधार्‍यांकडे उरला आहे. अपयशी ठरल्याने मंत्री उघडे पडले. अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी पक्षच आंदोलन करु लागल्याची केविलवाणी अवस्था दिसते, अशी टीका आ.विखे पा. यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news