लोणी: बचत गटांना प्रवरा बँकेतून कर्जाची व्यवस्था करू : माजी मंत्री आ. विखे पाटील | पुढारी

लोणी: बचत गटांना प्रवरा बँकेतून कर्जाची व्यवस्था करू : माजी मंत्री आ. विखे पाटील

लोणी : पुढारी वृत्तसेवा: औषधी व सुगंधी वनस्पतींच्या शेती संवर्धनात सीमॅपसारख्या संशोधन संस्थेने मार्गदर्शन करण्याची घेतलेली भूमिका महत्वपूर्ण आहे. वनस्पती शेतीतूनही आता रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात. कृषी क्षेत्रातील या नवीन प्रयोगासाठी महिला बचत गट पुढे आल्यास प्रवरा सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जाची उपलब्धता करुन देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जनसेवा फौंडेशन, राहाता पंचायत समिती आणि लखनौ येथील सीमॅप या संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने औषधी, सुगंधी वनस्पती लागवड व फुलशेतीच्या संदर्भात कार्यशाळेचे लोणी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस वनस्पती शेती क्षेत्रात कार्यरत शेतकरी व बचत गटांमधील महिला उपस्थित होत्या.

या कार्यशाळेत सीमॅप संस्थेचे संचालक डॉ. प्रबोधकुमार त्रिवेदी, सीमॅपचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अलोक कार्ला, सीमॅपचे निर्देशक डॉ. महेंद्र दारोरकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, रणरागीणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. संभाजी नालकर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्यासह सीमॅप संस्थेचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.

आ. विखे पा. म्हणाले, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या शेतीचे संवर्धन करण्यासाठी कृषी क्षेत्रातील नव्या प्रयोगाची सुरुवात आपल्या भागात होत आहे. ही शेती करण्यासाठी उत्सुक असलेल्या किंवा सध्या ही शेती करीत असलेल्या शेतकर्‍यांसाठी हा सुरु होत असलेला प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे. औषधी वनस्पतींबाबत केंद्र सरकारनेच आता महत्वपूर्ण धोरण घेतले आहेच, परंतु, सीमॅपसारखी संशोधन संस्था यामध्ये पुढाकार घेवून शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावल्याने या वनस्पती शेतीकडे आता उद्योग म्हणूनच पहावे लागेल. यातून शेतकर्‍यांना मोठ्या संधी उपलब्ध होतील.

वनस्पती शेती क्षेत्रातील उत्पादनातून बचत गटांचे कर्जही वसुल होवू शकते, ही खात्री असल्यामुळे सीमॅप संशोधन संस्था मंजुर करेल, त्या बचत गटाच्या प्रकल्पाला प्रवरा सहकारी बँकेच्या माध्यमातून पाठबळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रबोधकुमार त्रीवेदी, शास्त्रज्ञ डॉ.अलोक कार्ला, समर्थ शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सीमॅप आणि जनसेवा फौंडेशन यांच्या माध्यमातून उत्पादीत होणार्‍या सॅनीटरी नॅपकीनच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. लखनौ येथे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रतिनिधींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. राहाता तालुक्यातील 70 बचत गटांना 1 कोटी 61 लाख 36 हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बचत गटांना एक नवी दिशा मिळेल
कोरोनानंतर औषधी वनस्पतींच्या संदर्भात एक कार्यक्रम घेवून औषधी वनसस्पतींचे वाटप जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून केले होते. औषधी वनस्पतींची परसबाग हा प्रकल्प हाती घेतला होता. या कार्यशाळेनिमित्त या प्रकल्पालाच आता मोठे स्वरुप प्राप्त होत आहे. सीमॅपच्या माध्यमातून महिला बचत गटांना एक नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Back to top button