झाकीर नाईकने देणगी दिली, ‘त्या’ चौकशीत काही आढळले नाही; संजय राऊतांच्या आरोपांवर विखे पाटलांचे स्पष्टीकरण

झाकीर नाईकने देणगी दिली, ‘त्या’ चौकशीत काही आढळले नाही; संजय राऊतांच्या आरोपांवर विखे पाटलांचे स्पष्टीकरण

पुणे, पुढारी ऑनलाईन: भारतातील वादग्रस्त धर्मगुरु आणि देशद्रोहाचा आरोप असलेला झाकीर नाईक याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा येथील संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर ही देणगी कायदेशीर दृष्ट्या नियमित असून यासंदर्भात यापूर्वीच ईडीने देखील सखोल चौकशी केली होती. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही, असा खुलासा महसूल मंत्री विखे पाटील यांनी केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. झाकीर नाईक याने विखे पाटील यांच्या संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती त्याबाबत विखे पाटील यांनी आज हा खुलासा केला.

झाकीर नाईक यांनी प्रवरा संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिली होती, अशी कबुली विखे यांनी यावेळी दिली. मी त्या संस्थेचा जबाबदार घटक असल्याने ती जबाबदारी झटकणार नाही. मात्र, यासंदर्भात केंद्रीय यंत्रणांनी चौकशी केली होती. त्यांना त्यात कोणतीही अनियमितता आढळली नाही. त्यामुळे हा विषय तिथेच संपून जातो. या संदर्भात कोणाला अजूनही काही शंका असल्यास मीच ईडीला पत्र देऊन चौकशीची मागणी करतो, असेही ते यावेळी म्हणाले. ज्यावेळी देणगी दिली त्यावेळेस नाईक याच्यावर देशद्रोहाचे कोणतेही आरोप नव्हते. मात्र, त्यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारावर हे आरोप ठेवण्यात आले. तसेच देशद्रोह्याकडून देणगी घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news