चंदिगड; पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या पत्नी नवज्योत कौर (navjot kaur sidhu) यांनी पंजाबच्या राजकारणाबाबत धक्कादायक दावा केला आहे. नवज्योत कौर म्हणाल्या की, त्यांच्या पतीने भगवंत मान (Bhagwant Mann) यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची भेट दिली आहे. कौर यांनी त्यामागचे कारणही सांगितले. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबचे नेतृत्व करावे असे एकेकाळी वाटत होते, परंतु त्यांनी त्यांच्या पक्षाशी (काँग्रेस) विश्वासघात न करण्याचा निर्णय घेतला, असा दावा कौर यांनी केला. (Bhagwant Mann vs Navjot Singh Sidhu)
नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असताना नवज्योत कौर यांचा हा दावा समोर आला आहे. यावेळी कौर ट्वीट करत म्हणाल्या, "मुख्यमंत्री भगवंत मान, आज मी तुमचे लपलेले रहस्य उघड केले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात, ती तुम्हाला तुमचा मोठा भाऊ नवज्योत सिद्धू यांनी भेट दिली आहे, हे तुम्हाला समजले पाहिजे. नवजोत यांनी पंजाबचे नेतृत्व करावे, अशी तुमच्याच ज्येष्ठ नेत्याची इच्छा होती.
'केजरीवाल यांनी अनेक माध्यमातून संपर्क साधला'
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (arvind kejriwal) यांनी राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सिद्धू यांच्याशी विविध माध्यमांतून संपर्क साधला होता, असा दावाही कौर यांनी यावेळी केला. पंजाबमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका झाल्या आणि आप (AAP) च्या प्रचंड विजयानंतर भगवंत मान मुख्यमंत्री झाले. (Bhagwant Mann vs Navjot Singh Sidhu)
कौर म्हणाल्या, की केजरीवाल यांना सिद्धू यांची पंजाब राज्याबद्दलची तळमळ माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी पंजाबचे नेतृत्व करण्यासाठी विविध माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क साधला, पण सिद्धू यांना त्यांच्या पक्षाशी गद्दारी करायची नव्हती.
'सुवर्ण पंजाब राज्याचे सिद्धूचे स्वप्न'
कौर पुढे म्हणाल्या की, नवज्योत सिद्धू यांना फक्त पंजाबच्या कल्याणाचीच चिंता आहे. त्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, " गोल्डन पंजाब राज्य हे त्यांचे स्वप्न आहे आणि ते 24 तास जगतात."
अधिक वाचा :