Gangster Goldy Brar | गँगस्टर्स गोल्डी ब्रार विरोधात पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, १ हजारहून अधिक ठिकाणी छापे

Gangster Goldy Brar | गँगस्टर्स गोल्डी ब्रार विरोधात पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, १ हजारहून अधिक ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन : गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील (singer Sidhu Moose Wala murder case) आरोपी गोल्डी ब्रार (Gangster Goldy Brar) याच्या जवळच्या गँगस्टर्सना अटक करण्यासाठी पंजाब पोलिस ॲक्शन मोडवर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये १ हजारहून अधिक ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई सकाळी ७ वाजता सुरू झाली असून ती दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबमधील मोगा, फिरोजपूर, तरन तारन आणि अमृतसर ग्रामीण भागात पोलिसांचे छापे सुरू आहेत.

पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अर्पित शुक्ला यांनी सांगितले की, गँगस्टर गोल्डी ब्रारच्या साथीदारांना पकडण्यासाठी कारवाई सुरू असून यासंदर्भात १ हजारहून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. "गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंधित असलेल्या १ हजारहून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. राज्यातील वरिष्ठ अधिकारी या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. मोस्ट वाँटेड गँगस्टर्स विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना त्यांना भारतात आणले जाईल आणि येथील कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शुक्ला यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

संशयितांना ताब्यात घेण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या कारवाईचा अहवाल आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत अतिरिक्त पोलीस महासंचालकांना (एडीजीपी) सादर केला जाणार असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

गोल्डी ब्रार हा २९ मे २०२२ रोजी रॅपर आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. गोल्डी ब्रारने अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याने कॅनडा आणि अमेरिकेत आश्रय घेतला. पण त्याचे साथीदार देशातच राहिले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गोल्डी ब्रार विरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल केला होता. पंजाबमध्येही त्याच्याविरुद्धचे अनेक खटलेही प्रलंबित आहेत.

देशातील दहशतवादी आणि गँगस्टर्सचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्या वर्षी नोंदवलेल्या दोन प्रकरणांच्या तपासात कोण वॉन्टेड आहेत, अशा ५४ व्यक्तींच्या छायाचित्रांसह एनआयने बुधवारी दोन लिस्ट जारी केल्या होत्या. त्यात गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई आणि अर्शदीप सिंग गिल यांच्यासह अनेक वॉन्टेड गँगस्टर्सचा समावेश आहे.

एका लिस्टमध्ये ११ जणांची नावे आहेत आणि दुसऱ्यामध्ये ४३ आहेत. ही माहिती एनआयएने त्यांच्या अधिकृत X हँडलवरून पोस्टद्वारे दिली आहे. (Gangster Goldy Brar)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news