Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचे धरणे आंदोलन यशस्‍वी

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचे धरणे आंदोलन यशस्‍वी

इंदापूर ; पुढारी वृत्तसेवा

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी इंदापूर येथे तालुक्यातील शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला 31 तासांनी यश मिळाले आहे. इंदापूर तालुक्यातील शेतीच्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी गेले 11 दिवस बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला. या बाबतची माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी बेमुदत धरणे आंदोलनाच्या यशस्वी सांगता प्रसंगी (रविवार) इंदापूर येथे दिली. या वेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

11 दिवसांपासून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा गेल्या 11 दिवसांपासून महावितरणने पूर्णपणे खंडित केला आहे. परिणामी, शेतीपिकांचे मोठे नुकसान होत होते. तसेच जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी भाजप नेते व मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी इंदापूरच्या महावितरण कार्यालयासमोर शनिवारी (दि. 27) सकाळी 10 वाजल्‍यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.

या बेमुदत आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो शेतकरी सहभागी झाले.

शेतकऱ्याने प्रत्येक हॉर्सपॉवरला 500 रुपयेप्रमाणे वीज बिलाची रक्कम भरावी

पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्याने प्रत्येक हॉर्सपॉवरला 500 रुपयेप्रमाणे वीज बिलाची रक्कम भरावी. प्रत्येक डीपीला रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 80 टक्के ऐवजी 60 ते 70 टक्के एवढी असली तरी डीपी चालू करण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना वीज बिलाची रक्कम जास्त आलेली असल्याने लवकरच तालुक्यात वीजबिल दुरुस्तीचे मेळावे घेतले जातील, या मेळाव्याची तारीख शेतकऱ्यांना कळविण्यात येईल.

11 दिवसानंतर संकटातील  शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पाटील (Harshvardhan Patil) यांची महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांच्याशी सुमारे दोन ते अडीच तास चर्चा झाली. या वेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व भाजपचे पदाधिकारी तसेच उपअभियंता रघुनाथ गोफणे, मोहन सूळ उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील शेतीचा वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याने गेली 11 दिवस संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांचा आंदोलनास पाठिंबा

या बेमुदत धरणे आंदोलन प्रसंगी राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दूरध्वनीवरून भाजपनेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news