एअरटेल, व्होडाफोन यांचे रिचार्ज महागले | पुढारी

एअरटेल, व्होडाफोन यांचे रिचार्ज महागले

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ सीएनजी महागले. मासे खाणे सर्वसामान्यांसाठी अवाक्याबाहेर गेले. टोमॅटो, कांदाही महाग झालाय. आता रोजच्या वापरातील मोबाईल फोनचे रिचार्जही महागले आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड प्लानमधील बेसिक रिचार्जमध्ये भरमसाट वाढ करत मोबाईल ग्राहकांना जबरदस्त झटका दिला आहे.

यामुळे प्रीपेड प्लान वापरणार्‍या प्रत्येक ग्राहकाला या दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. त्यामुळे टेलिकॉम सेवा आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे उघड झाले असून या दरवाढीमुळे प्रीपेड सेवा वापरणार्‍या ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

व्होडाफोन व आयडिया मिळून तयार झालेल्या व्ही कंपनीने या दरवाढीमुळे त्यांच्या महसुलात तब्बल 10 टक्क्यांची वाढ अपेक्षित केली आहे. या दरवाढीनंतर मार्च 2022पर्यंत तिजोरीत तब्बल 340 कोटी डॉलरची अतिरिक्त वाढ होईल, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.

दरम्यान, पूर्वी 79 रुपयांत 28 दिवस सेवेचा आनंद लुटणार्‍या ग्राहकांना नव्या दरवाढीमुळे प्रत्येक महिन्याला 20 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. म्हणजेच 28 दिवसांसाठी आता किमान रिचार्ज हा 99 रुपयांचा असेल. या प्लानमध्ये 50 टक्के अधिक बोलता येणार आहे. याशिवाय 200 एमबीपर्यंत इंटरनेट सेवेसह 1 पैसा प्रति सेकंद या दराने प्रत्येक कॉलसाठी अतिरिक्त पैसे आकारले जातील. यासोबतच 149 रुपयांत मिळणार्‍या 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी आता ग्राहकांना 179 रुपये मोजावे लागतील.

भारती एअरटेल नेही त्यांच्या मोबाईल प्रीपेड प्लानच्या दरात वाढ केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने बर्‍याच वर्षांनंतर त्यांच्या बेसिक प्लानमध्ये तब्बल 20 ते 25 टक्क्यांची वाढ केली आहे. व्ही कंपनीप्रमाणे एअरटेलसाठीही ग्राहकांना 28 दिवसांसाठी 79 रुपयांऐवजी आता 99 रुपयांचा रिचार्ज खर्च करावा लागेल. याशिवाय दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना सारख्याच सुविधा मिळणार आहेत.

या दरवाढीचा फायदा कंपनीच्या ग्राहकांना नेटवर्कमध्ये सुधारणेसह आवश्यक गुंतवणुकीसाठी होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Back to top button