शंभूराज देसाई : 'सुपरहिट ‘शोले’ पिक्चर 2024 ला दाखवतो' - पुढारी

शंभूराज देसाई : 'सुपरहिट ‘शोले’ पिक्चर 2024 ला दाखवतो'

सणबूर; पुढारी वृत्तसेवा

पाटणच्या जनतेने तुम्हाला दोन वेळा 15 आणि 18 हजाराने पिक्चर दाखवला आहे. जिल्हा बँकेचा ट्रेलर फक्त तीन ते चार दिवसच चालेल. पण मी तुम्हाला 2024 ला सुपरहिट शोले सारखा पिक्चर दाखवतो, असा इशारा गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना दिला.

नाटोशी (ता. पाटण) येथे ना. शंभूराज देसाई यांनी सन 2020- 21 च्या अर्थ संकल्पातून चार कोटी रुपये मंजूर करुन नाटोशी ते कुसरुंड स्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, जि.प.सदस्य सुग्रा खोंदू, माजी जि. प. सदस्य बशीर खोंदू, गणेश भिसे, माजी पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार, विष्णुपंत देसाई, सरपंच अविनाश कुंभार, उपसरपंच उदय देसाई, विष्णू मोरे, संपत कोळेकर, आनंदा मोहिते आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि त्यामुळे आघाडी धर्म पाळा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गाफील राहिलो. त्यामुळे माझा मोजक्या मतांनी पराभव झाला. परंतु ते एक प्रकारे बरेच झाले. त्यानिमित्ताने मला पुढचा धोका तरी लक्षात आला. आता तीन वर्षे माझ्या हातात आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्त्वाची पाच खाती माझ्याकडे दिली आहेत. त्याच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट करणार असून यापूर्वी देखील गट-तट बाजूला ठेवून संपूर्ण तालुक्यात विकासाचा रोडमॅप तयार करुन कामे केली आहेत.

पाटणकर आमदार असताना 21 वर्षे केवळ माझा बालेकिल्ला म्हणून मोरणा भागावर विकासकामात अन्याय केला. याउलट लोकनेते बाळासाहेब देसाई पहिल्या निवडणुकीत अवघ्या 99 मतांनी निवडून आले. पण त्यांनी तालुक्यात विकासकामे करताना कधी दुजाभाव केला नाही. आपलापरका असा भेदभाव न करता गाव तिथे विकास पोहचवला. त्याच शिकवणीवर वाटचाल करत 2004 ला मी आमदार झाल्यापासून कर्तव्य भावनेतून तालुक्यात नळ योजना, छोटे-मोठे पुल, रस्ते यासाठी प्रत्येक भागात भरभरून निधी दिला आहे.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, मी राज्याच्या मंत्रीमंडळात पाच प्रमुख खात्यांचा मंत्री आहे. त्यामुळे माझ्या गाडीचा भोंगा तर वाजणारच. मी मंत्री असल्याने मला तो अधिकारच आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून थोडी माहिती घ्या, असा टोलाही त्यांनी सत्यजित पाटणकर यांना लगावला. स्वागत व प्रास्ताविक माजी जि.प. सदस्य बशिर खोंदू यांनी केले. आभार अ‍ॅड. मारुती देसाई यांनी मानले.

तुम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे…

माझ्या भोंग्याचे वाईट वाटून घेण्यापेक्षा माझ्या बरोबर या, तुम्हाला माझ्या बाजूला बसवून तालुक्यात फेरफटका मारून आणतो. असे म्हणत मी मंत्री असल्याने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या माणसांवर बोलण मला शोभत नाही, अशा शब्दात ना. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांची खिल्ली उडवत त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

Back to top button