मंत्रिमंडळ विस्तारात पुण्याला मिळणार संधी? यांची नावे चर्चेत

मंत्रिमंडळ विस्तारात पुण्याला मिळणार संधी? यांची नावे चर्चेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसांत होणार असल्याने त्यात पुणे जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, राहुल कुल आणि महेश लांडगे; तर राष्ट्रवादीतील उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून दत्ता भरणे आणि दिलीप मोहिते पाटील यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या वर्षभरापासून लांबणीवर पडला आहे.

मात्र, अजित पवार हे थेट सरकारमध्ये सहभागी होऊन नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले आहेत. या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार जवळपास निश्चित आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार, याकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यात भाजपकडून मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना संधी मिळू शकते.

अनुसूचित जाती प्रवर्गाला प्रतिनिधित्व देण्याचा विचार झाल्यास पुणे कॅन्टोन्मेन्टचे आमदार सुनील कांबळे यांच्याही नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. याशिवाय, जिल्ह्यातून भाजपचे एकमेव आमदार असलेले राहुल कुल आणि पिंपरी-चिंचवड शहरातून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, भाजपच्या कोट्यातून मंत्र्यांची संख्या पाहता मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांना जिल्ह्यातील दहापैकी सात ते आठ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची शक्यता आहे. खेडचे आ. दिलीप मोहिते पाटील यांनीही मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news