महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर भाजपचे वर्चस्व? | पुढारी

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर भाजपचे वर्चस्व?

सुनील जगताप

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने क्रीडापटूंमध्ये चर्चा रंगली असून, आता असोसिएशनवर भाजपचे वर्चस्व राहणार का, अशी शंका खेळाडूंसह क्रीडा संघटनांनी उपस्थित केली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यासमवेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना ही मंत्रिपदाची शपथ घेण्यात यशस्वी झाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, भारतीय कुस्ती महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन या संघटनांवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा कार्यरत आहेत. महत्त्वाच्या क्रीडा संघटनांवर भाजपचे वर्चस्व असल्याने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर ही भाजपा आपले वर्चस्व राखणार का किंवा अजित पवार आपले पद ताब्यात ठेवणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

प्रवीण दरेकर एमओएचे अध्यक्ष?

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष अजित पवार यांनी वरिष्ठ पदाधिकार्‍याच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून ताशेरे ओढले असल्याची चर्चा आहे. त्यानंतर संबंधित वरिष्ठ पदाधिकार्‍याने आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेत आपण अध्यक्ष व्हावे, अशी गळ घातली. मात्र, दरेकर यांनी अजित पवार यांनी राजीनामा दिल्यास अध्यक्ष होऊ, असे स्पष्ट सांगत प्रस्ताव तूर्तास धुडकावून लावल्याची चर्चा असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांमध्ये आहे.

Back to top button