‘अजमेर शरीफसह नागपुरातील ताजबाग होणार ‘सूफी कॉरिडॉर’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

‘अजमेर शरीफसह नागपुरातील ताजबाग होणार ‘सूफी कॉरिडॉर’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील ताजबाग, प्रसिद्ध अजमेर शरीफसह भारताच्या विविध भागात असलेल्या मुस्लिम समाजाच्या विविध धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी 'सूफी कॉरिडॉर' बांधण्यात येईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा 'सूफी कॉरिडॉर' पाहण्यासाठी जगभरातून विशेषत: अरब देश आणि युरोपमधून भाविक येतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या 

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून गुजरातपर्यंत, राजस्थानमधील अजमेर शरीफचा सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती दर्गा, हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा यासह देशातील मुस्लिम समाजाची सर्व पवित्र स्थळे विकसित केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यासाठी त्यांच्या वतीने चादर अर्पण केली.

या बैठकीला अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. यावेळी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ताजबाग, नागपूरचे अध्यक्ष प्यारे खान उपस्थित होते.

नागपूरच्या हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या विकासासाठी राज्य सरकारने २५० कोटी रुपये खर्च केले आहेत. नागपूरचे खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून नागपूरच्या हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचा ताजाबाद दर्गा विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, दिल्ली हज समितीच्या अध्यक्षा कौसर जहाँ, उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य तारिक मन्सूर प्रामुख्याने उपस्थित होते.

दरवर्षी उत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर देतात. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे सदस्य १३ जानेवारीला दुपारी अजमेर शरीफ येथील दर्ग्यात ही चादर अर्पण करतील. यावर्षी ८१२ वा उत्सव अजमेर शरीफ दर्ग्यात साजरा होत आहे हे विशेष आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news