Nagar : वाहने अडवून चालकांच्या तोंडाला फासले काळे | पुढारी

Nagar : वाहने अडवून चालकांच्या तोंडाला फासले काळे

नगर : पुढारी वृत्तसेवा : हिट अ‍ॅण्ड रन कायद्याच्या विरोधात राज्यात वाहनचालकांनी स्टिअरिंग बंद आंदोलन पुकारले आहे. आज सकाळी कोठला येथे आंदोलकांनी मालवाहू वाहने अडवून त्यांच्या चालकांच्या तोंडाला काळे फासले. वाहनांची हवा सोडून देत तीव्र निदर्शने केली. देशात हिट अ‍ॅण्ड रन कायद्याला विरोध होत आहे. राज्यातही मालवाहू ट्रक चालकांकडून विरोध केला जात आहे. या कायद्याविरोधात चालकांनी स्टिअरिंग बंद आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील कोठला बसस्थानक येथे आंदोलकांनी वाहने अडविली. चालकाच्या तोंडाला काळे फासले. काही वाहनांची हवा सोडून देण्यात आली. वाहनचालकांना चपलांचा हार घालून केंद्र सरकारचा निषेध केला. दरम्यान, रस्त्यांवर वाहने अडविल्याची माहिती मिळाताच तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे व कोतवालीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सौम्य लाठीमार करीत काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.

संगमनेरात 7 जणांविरुद्ध गुन्हा
संगमनेर शहर : वाहनचालकांचा संप सुरू आहे, असे म्हणत दिल्ली नाका येथील तीनबत्ती चौकात अत्यावश्यक सेवेतील वाहने अडविल्याच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. समीर शेख, सलीम बागवान, रईस शेख, तौफिक शेख, शाहरुख शेख, शकिल दबेदार, मुन्ना शेख अशी त्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक निवांत जाधव, सहायक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलिस नाईक लता जाधव, विशाल कर्पे यांनी ही कारवाई केली. कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाठ यांनी फिर्याद दिली.

हेही वाचा :

Back to top button