Waghapur: आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघेल, समाजात भांडणे लागतील : वाघापूर येथे भाकणूक

Waghapur: आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघेल, समाजात भांडणे लागतील : वाघापूर येथे भाकणूक


मुदाळतिट्टा: उसाच्या कांड्याने, दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ होईल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघेल, समाज- समाजात भांडणं लावतील, देशात मोठा कायदा येईल, राजकारणात मोठा गोंधळ होईल, भगवा झेंडा राज्य करील, अशी भविष्यवाणी कृष्णात डोणे-पुजारी वाघापूरकर यांनी केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र वाघापूर (Waghapur) (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्यांनी भाकणूक केली.

राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक भाकणुकीचा गोषवारा पुढीलप्रमाणे : वाघापूर गावाचं नाव दुरवर हाय, वेदगंगा नदीच्या काठी बाभळीच्या बनात माझी वस्ती हाय, वाघापूर गावचा महिमा अगाध हाय तो वाढत जाईल, दूर देशीचे लोक पाहायला येतील. (Waghapur)

साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील, साखर कारखान्यांच्या निवडणुकांत मोठा गोंधळ होईल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, शेतीचे भाव वाढत जातील, दुष्काळ पडेल, मेघराजाची वाट पाहावी लागले. गैर हंगामी पाऊस आहे. मेघराजाच्या पोटी आजार आहे. पाऊस पाणी पिके यांचे हंगाम बदलत जातील. नदीला कुलपे पडतील. पाण्यासाठी मोठा तंटा होईल. कुणब्याच्या बाळाला मोठा विचार पडेल. कुणब्याच्या बाळाला सांभाळायला खोटी आश्वासन दिली जातील. कुणबीच सर्वांचा तारणहार ठरेल.

कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल, दीड महिन्याचे धान्य उदंड पिकलं, तांबडी रास मध्यम पिकलं, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, चालता बोलता मनुष्याला मरण येईल, माझं माझं म्हणू नका, माणसाला माणूस खाऊन टाकील, येतील येतील लाकडाची डोरली येतील, तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर होईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, नदीकाठावरील जमीन ओसाड पडेल, गर्वानं वागू नका, गर्वाचं घर खालीच होईल, भूकंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल, ज्योतिर्लिंगाची करशीला सेवा तर खाशीला मेवा, बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन.

यावेळी भाकणुकीस ज्योतिर्लिंग देवालयाचे पुजारी दत्ता गुरव, जोतिर्लिंग देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष, सरपंच बापूसाहेब आरडे, समितीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सर्व नवरात्रकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news