पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या सहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. यामध्ये चार दिवस अमेरिका आणि दोन दिवस इजिप्त (Egypt Visit) असा दौरा नियोजित आहे. यातील अमेरिकेचा दौरा नुकताच पार पडला आहे. या दौऱ्यानंतर आज पीएम मोदी हे इजिप्त दौऱ्यावर पोहचले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामधून भारताला काय फायदा होईल याचा आढावा घेऊया.
शनिवारी (दि. २४) पीएम मोदी हे इजिप्तमध्ये पोहोचले. राष्ट्रपती अब्दुल फतेह अल-सीसी यांची ते भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये या दोन मोठ्या नेत्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण चर्चा होईल असा अंदाज वर्तविण्यात येणार आहे. याचे कारण म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इजिप्तच्या राष्ट्रपतींनी स्वत: पीएम मोदींना भेटीकरिता बोलावलेले होते. इजिप्त या मैत्रीपूर्ण देशाचा भेट देणे हा माझा पहिला राजकीय दौरा असणार आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी परदेश दौऱ्याला निघण्यापूर्वी दिलेली होती.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये जी-२० परिषदेची (G-20) बैठक पार पडली. या परिषदेवर पाकिस्तानच्या (Pakistan) आवाहनानंतर चीन (China), तुर्की (Turkey ) आणि सौदी-अरब (Saudi Arabia) या देशांनी सहभाग नोंदवला नाही. पाकिस्तानच्या याच आवाहनावरुन इजिप्त देश देखील सहभागी झालेला नव्हता. त्यामुळे आता पीएम यांच्या इजिप्त दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीतून दोन देशांमधील संबंध अजून बळकट होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
राष्ट्राध्यक्ष अब्दूल फतेह यांनी यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावलेली होती. यापूर्वी ते २०१५ आणि २०१६ साली भारत दौऱ्यावर आलेले होते. यावेळी या दोन नेत्यांमध्ये द्विपक्षीय कराराबाबत चर्चा झालेली होती. पण तरीही सीसी यांनी जी-२० परिषदेच्या बैठकीत अनुपस्थिती दर्शविली. मीडिया रिपोर्टनुसार, इजिप्त पाकिस्तानच्या आवाहनामुळे या बैठकीत सहभागी झालेला नव्हता. त्यामुळे या भेटीत यासारख्या अनेक घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चांमधून भारत आणि इजिप्त या दोन देशांतील आंतरराष्ट्रीय संबंध आणखी चांगले होतील असा अंदाज आहे.
दोन्ही देशांमध्ये सुमारे सात अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. या वर्षी जानेवारीमध्ये अल सिसी भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा दोन्ही देशांनी व्यापार $7 अब्ज वरून $12 अब्ज पर्यंत वाढवण्याचा करार केला होता. एवढेच नाही तर प्रथमच संयुक्त लष्करी सरावही करण्यात आला. इजिप्तने भारताकडून तेजस लढाऊ विमाने, रडार, लष्करी हेलिकॉप्टर आणि आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. आता भारत इतरांकडून संरक्षण उत्पादने विकत घेऊन ही उत्पादने पुन्हा अन्य दुसऱ्या देशाला निर्यात करेल. सध्या भारताकडून संरक्षण उत्पादने खरेदी करणारे एकूण ३० हून अधिक देश आहेत. त्यामुळे या भेटीत व्यवसायासंबंधीच्या काही चर्चा दोन्ही देशांमध्ये होऊ शकतील.
इजिप्तलाही भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याचा फायदा होऊ शकतो. याचे कारण म्हणजे शिक्षण, आयटी, संरक्षण या क्षेत्रात इजिप्तला भारताची मोठी मदत होईल.
इजिप्तला अनेक दिवसांपासून परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत या देशाला भारताच्या मदतीची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात याची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे.
इजिप्त हा भारतासाठी आफ्रिकेत गुंतवणूक करण्याचा मार्ग बनू शकतो कारण इजिप्त पश्चिम आशिया आणि आफ्रिकेच्या राजकारणात सक्रीय देश आहे. या सर्व बाबी पाहता पंतप्रधान नरेंद्र यांच्या इजिप्त दौऱ्यानंतर या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याने आर्थिक आणि राजकीय फायदे होतील असा अंदाज आहे.
हेही वाचा