मिरवणुकीत आव्वाज ! पुण्यातील आठ मंडळांविरुद्ध गुन्हे

मिरवणुकीत आव्वाज ! पुण्यातील आठ मंडळांविरुद्ध गुन्हे

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विसर्जन मिरवणुकीत ध्वनीपातळीची मर्यादा ओलांडणारी मंडळे तसेच साउंड यंत्रणा (डीजे) पुरवठादारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आठ खटले दाखल केले आहेत. एकीकडे डीजे, दुसरीकडे लेझर लाइट. मग कानावर हात आणि डोळे बंद करून उत्सवात सहभागी व्हायचे का? असा प्रश्न येत्या काही वर्षांत सर्वसामान्यांपुढे उभा राहणार आहे.

संबंधित बातम्या :

पुणे पोलिसांनी येरवडा, हडपसर, वानवडी, विमानतळ, चंदननगर, कोथरूड भागातील मंडळे आणि डीजेवाल्यांविरुद्ध आठ गुन्हे दाखल केले आहेत. विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरील सुमारे 70 ते 80 खटले ध्वनिमर्यादा तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

विसर्जन मिरवणूक तसेच उत्सवाच्या कालावधीत उच्चक्षमतेची साउंड सिस्टिम वापरल्याने नागरिकांना त्रास झाला होता. याबाबत सामान्य नागरिक तसेच विविध राजकीय पक्षकार्यकर्त्यांनी ध्वनिप्रदूषण करणार्‍या मंडळांवर नाराजी व्यक्त केली होती. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेत ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यंदा डीजेवाल्यांनी रात्रीच्या वेळी लेझर लाइटचा मोठा वापर केला. नियमानुसार या लाउटना बंदी आहे. असे असतानादेखील ते वापरले गेले. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचे समोर आले आहे.

धडकी भरवणारा आव्वाज…
निवासी क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत 55 डेसिबल आणि रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत 45 डेसिबल अशी ध्वनिमर्यादा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केली आहे. विसर्जन मिरवणुकीत सुमारे 130 डेसिबलची मर्यादा ओलांडण्यात आली होती. त्यामुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. 2018 मध्ये गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचे 64 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2019 मध्ये ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी 16 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दणदणाटाचा त्रासच

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन सोहळ्यात ध्वनवर्धक, ढोल-ताशांचा दणदणाट झाला. सलग 36 तासांपेक्षा जास्त वेळ आणि ढोल पथकांच्या दणदणाटाला सामोरे गेलेल्या पोलिसांना विसर्जन मिरवणुकीनंतर कानावर हात ठेवावे लागले होते. पुण्यातील विसर्जन सोहळा पाहण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक येतात. नेत्रदीपक रोषणाई, देखावे विसर्जन सोहळ्यातील आकर्षण असते. मात्र, पंधरा ते वीस वर्षांपासून विसर्जन सोहळ्यात साउंडच्या भिंती उभ्या करण्याची स्पर्धा सुरू झाली. ढोल पथकांनी मर्यादा ओलांडली. पुण्यातील विसर्जन मिरवणूक सोहळा यंदा 30 तास 25 मिनिटे सुरू राहिला. मंडईतील टिळक चौकातून गुरुवारी (28 सप्टेंबर) सकाळी सव्वादहाच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीची सांगता शुक्रवारी (29 सप्टेंबर) दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी झाली. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दणदणाटाच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. साउंड, ढोल-ताशा पथके, लेझर दिव्यांमुळे त्रास झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. विसर्जन मार्गावरील रहिवाशांना दणदणाटाचा सर्वाधिक त्रास झाला.

पोलिसांचेही डोके गरगरले, कान झाले बधिर
आवाजाच्या गोंगाटामुळे पोलिसांची अवस्था इतरांपेक्षा वेगळी नव्हती. पोलिसांनी सलग 38 तास बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांसह साडेआठ हजार पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभागी झाले होते. डीजेसमोर पोलिस थांबले होते. ढोल पथकांचा दणदणाट सुरू होता. या दणदणाटाचा सर्वाधिक त्रास त्यांनादेखील झाला. विसर्जन मिरवणुकीनंतर घरी गेल्यानंतर काही ऐकू येत नव्हते. डोके गरगरत होते. कान बधिर झाले होते. विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर सुन्न झाल्यासारखे वाटत होते, असे प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभागी झालेले वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news