Pune School News : काय सांगता ! ३५० विद्यार्थ्यांना पाचच शिक्षक; पुण्यातील स्थिती

Pune School News : काय सांगता ! ३५० विद्यार्थ्यांना पाचच शिक्षक; पुण्यातील स्थिती

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याजवळील धायरी येथील दळवीवाडी येथे कै. इंदुमती दळवी मनपा शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच वर्गात 104 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसावे लागत असून, कोंढवाड्यापेक्षा भीषण चित्र या शाळेत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

शहर व जिल्ह्यातील सरकारी शाळेकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, दळवी शाळेत चांगल्या सुविधा, स्वच्छता असल्याने विद्यार्थ्यांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत 351 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्येनुसार या शाळेत 11 शिक्षकांची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात पाचच शिक्षक आहेत. प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या आहेत. इयत्ता दुसरीला तीन तुकड्यांची आवश्यकता आहे. मात्र, दोनच तुकड्या आहेत.

प्रत्येक तुकडीला एका शिक्षकाची आवश्यकता असताना पाचच शिक्षक असल्याने दोन ते तीन तुकड्यांतील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात दाटीवाटीने बसवून शिकवण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे. चिमुरड्या विद्यार्थ्यांचा आरडाओरडा व गोंधळावर नियंत्रण ठेवताना महिला शिक्षकांची दमछाक होत आहे.

माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे व स्थानिक पालक शाळेत पुरेसे शिक्षक नियुक्त करावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्यापही शिक्षक नियुक्त करण्यात आलेले नाहीत. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अनिल लोले म्हणाले, 'कष्टकरी मजुरांची मुले भावी आयुष्याच्या ध्यासाने शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कमी शिक्षक असल्याने पायाभूत शिक्षण देणे अवघड झाले आहे.' शिक्षक अनिता शितोळे, निलेश पासलकर, सुरेखा यादव, सुनिता माने यांना आपल्या भावना मांडताना गहिवरून आले.

शिक्षकांअभावी अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सुटी घेता उपलब्ध शिक्षकांवर वर्ग भरवले जात आहेत.

-सुनीता साळुंखे,
मुख्याध्यापिका, कै. इंदुमती दळवी मनपा शाळा

या शाळेत शिक्षक कमी असल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेत तातडीने पुरेसे शिक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.

– संजयकुमार राठोड,
शिक्षण अधिकारी, महापालिकेच्या शिक्षण

दळवी शाळेत शिक्षकांअभावी गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. मात्र, शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही. दोन दिवसांत आवश्यक शिक्षक नियुक्त न केल्यास शाळेला कुलूप लावून सत्याग्रह करण्याचा इशारा सिंहगड विकास समितीचे कार्याध्यक्ष इंद्रजित दळवी यांनी दिला आहे.

– इंद्रजित दळवी
कार्याध्यक्ष, सिंहगड विकास समिती

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news