PBKS vs DC : दिल्लीचे पंजाबला २१४ धावांचे आव्हान

PBKS vs DC : दिल्लीचे पंजाबला २१४ धावांचे आव्हान

धरमशाला; वृत्तसंस्था : रिले रुसो आणि पृथ्वी शॉ यांच्या वादळी अर्धशतकांच्या बळावर दिल्लीने पंजाबविरुद्ध बुधवारच्या लढतीत दोन गड्यांच्या मोबदल्यात 213 धावा ठोकल्या. त्यांनी पंजाबला विजयासाठी 214 धावांचे आव्हान दिले आहे. दरम्यान, शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाबने 1.3 षटकांत 1 बाद 1 अशी धक्कादायक सुरुवात केली होती. शिखर धवनला भोपळाही फोडता आला नाही.

पंजाबने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तथापि, दिल्लीच्या फलंदाजांनी शिखर धवनचा हा निर्णय चुकीचा ठरवला. दिल्ली संघात पुनरागमन केलेला पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सुरुवात करून 62 चेंडूंत 94 धावांची खणखणीत सलामी दिली.

पृथ्वीने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. वॉर्नरने धावांचा पाऊस पाडताना 31 चेंडूंत 46 धावांची खेळी केली. यात त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. वॉर्नर बाद झाल्यानंतर पृथ्वीने रिले रुसोसोबत वादळी फलंदाजी केली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा धडाका लावला तो खासकरून रुसोने. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 28 चेंडूंत 54 धावा जोडल्या. यात रुसोचे योगदान होते 45 धावांचे. दरम्यान, पृथ्वी 54 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत एक षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली. यंदाच्या हंगामात पृथ्वीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तो वारंवार अपयशी ठरत होता. सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघाबाहेरही बसवले होते. अखेर त्याला संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.

पृथ्वी बाद झाल्यानंतर रुसो आणि फिल साल्ट यांनी वादळी फलंदाजी करत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारून दिली. या जोडीने अर्धशतकी भागीदारी करून दिल्लीचा डाव 200 धावांच्या पुढे नेला. रुसो 82 धावांवर नाबाद राहिला. साल्टने नाबाद 26 धावांचे योगदान दिले. फिल साल्ट आणि रिले रुसो यांनी तिसर्‍या विकेटसाठी 30 चेेंडूंत 65 धावा जोडल्या. साल्टने 14 चेंडूंत दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 26 धावा झोडल्या. तसेच रुसोने 37 चेंडूंत 82 धावांची खेळी करताना सहा षटकार आणि सहा चौकार हाणले.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news