गुणवंत कबड्डीपटू घडविणारे नगर: आमदार नीलेश लंके; जिल्हा कबड्डी संघातील गुणवंत कबड्डीपटूंचा सन्मान | पुढारी

गुणवंत कबड्डीपटू घडविणारे नगर: आमदार नीलेश लंके; जिल्हा कबड्डी संघातील गुणवंत कबड्डीपटूंचा सन्मान

नगर, पुढारी वृत्तसेवा: नगर जिल्हा कबड्डी संघाने जळगाव येथे मार्चमध्ये झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उपविजेता, तर पुण्यात झालेल्या आंतर जिल्हा युवा कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावून राज्यात चमकदार कामगिरी केली. नगरमध्ये अनेक गुणवंत खेळाडू असून, ग्रामीण भागातील खेळाडू जास्त, असे जिल्हा संघटेनेचे अध्यक्ष आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

जिल्हा हौशी कबड्डी संघटनेतर्फे मंगळवारी (दि.16) दुपारी नगरमध्ये जिल्हा कबड्डी संघाचा गौरव सोहळा आयोजित केला. यावेळी भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार शांताराम जाधव, नगर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार नीलेश लंके, राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाडे, राज्यातील कबड्डी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मार्चमध्ये जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत नगरच्या संघाने उपविजेते पटकावून सव्वा दोन लाखांची बक्षिस मिळविले. तर, पुण्यातील खराडी येथे युवा कबड्डी स्पर्धेत नगरच्या संघाने विजेतेपद पटकावून 20 लाखांची बक्षिस मिळविले. या स्पर्धेतील खेळाडू व प्रशिक्षक शंतनू पांडव, सहप्रक्षिक्षक परशुराम नाकाडे आदींचा जिल्हा हौशी कबड्डी संघटनेतर्फे सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.

आमदार नीलेश लंके म्हणाले, नगरचा संघ निवडताना फक्त गुणवत्ता पाहुन संघ निवडला जातो. ग्रामीण भागातून अनेक गुणवंत खेळाडू पुढे येत आहेत. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे भाषण झाले. जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाडे यांनी प्रास्ताविक केले. गाडे म्हणाले, नगरचा संघ येत्या चार – पाच वर्षात राज्यातील सर्वात अव्वल स्थान प्राप्त करणार असून, आधी पंकज शिरसाठने देशात नगरचा लौकीक वाढवला, आता शंकर गदई भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी संघर्ष करत आहे. राज्यात नगरचा दबदबा निर्माण करणार्‍या या खेळाडूंचा गौरव व्हावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे मुकेश मुळे, जयंत वाघ, विजयसिंह मिस्किन, सुभाष तनपुरे, गोविंद भुजबळ, प्रकाश बोरूडे, बाळासाहेब कडूस, पोपट कडूस, प्रा. सुधाकर सुंबे, रफिक शेख, संजय अनभुले आदी उपस्थित होते.

Back to top button