परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या अंबाजोगाई येथे झालेल्या भाषणावरून एक वादंग उठले. या भाषणात वंशवादावरील मुद्दा व 'मोदी मला संपवू शकणार नाहीत' अशा प्रकारच्या एका विधानावरून प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. यावर क्रिया -प्रतिक्रिया उमटत असताना याबाबत संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातील केवळ अर्धवट एक ओळच वापरून विनाकारण नकारात्मक अर्थ पसरविला जात असल्याचे म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिजीवी संमेलन कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी केल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत 'मोदी मला संपवू शकत नाहीत' असे वक्तव्य केल्याच्या बातम्या दाखवण्यात आल्या. पण मुंडे यांनी या अनुषंगाने "चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करु शकणार नाहीत " हा बोलण्याचा मतितार्थ असल्याचे आज सांगितले आहे. याबाबतचा संपूर्ण व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटर व अन्य सोशल माध्यमातून व्यक्त केली आहे.
दरम्यान, त्यांनी व्हिडिओ सोबत "मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले, त्यात बुद्धिजीवी संमेलनामधील माझ्या भाषणाच्या हायलाईटस्, आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे, "सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या लिंंकवर आहेच. धन्यवाद." अशी प्रतिक्रियाही त्यांनी लिहिली आहे.
हे वाचलंत का?