माझ्या बाबतीतील ‘नाराजी’ दूर करा: पंकजा मुंडे | पुढारी

माझ्या बाबतीतील 'नाराजी' दूर करा: पंकजा मुंडे

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात कोणतीही घडामोड झाली, विधान परिषद असो राज्यसभा असो, कोणती निवडणूक असो की अलीकडील मंत्रिमंडळ विस्तार असो. या सर्वच बाबतीत नेहमी “पंकजा मुंडे नाराज” अशा प्रकारे माझ्या बाबतीत “नाराजी” शब्द वापरला जातो. मात्र, ती नाराजी नसते, तर ती समर्थकांची आपल्या नेत्याविषयीची अपेक्षा असते. प्रसारमाध्यमांना माझी नम्र विनंती आहे की, माझ्या बाबतीत वापरल्या जाणारी ही नाराजीची बिरुदावली तुम्ही दूर करा, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळीत प्रसार माध्यमांशी बोलताना केले.

‘घरोघरी तिरंगा’ अभियानातर्गंत जनजागृती करण्यासाठी भाजपच्या वतीने आज शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंकजा मुंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीत रॅलीला सुरवात झाली.

भारतमाता की जय, वंदे मातरम, स्वतंत्र भारताचा विजय असो, वंदेमातरम्, अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता. उघड्या जीपमध्ये हातात तिरंगा ध्वज फडकावत पंकजा मुंडे रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
या रॅलीनंतर झालेल्या सभेत पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या, “आपण कधीही संघर्षाला घाबरत नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगणे शिकवले आहे. त्यांचाच वसा आणि जनसेवेचा वारसा आपण पुढे चालवत आहे. राज्यातील महिला, युवा, शेतकरी बांधव आदींचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी मी आग्रही आहे.”

ओबीसी व मराठा आरक्षण पुन्हा मिळाले पाहिजे यासाठी आणि समाजाच्या प्रत्येक प्रश्नांकरिता मी सतत संघर्ष करेन. तुमच्यासारखे सच्चे मावळे सोबत आहेत, तोपर्यंत मी कुठलीही लढाई हरणार नाही. फक्त तुमची साथ हवी आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा : 

Back to top button