परळी: पुढारी वृत्तसेवा – भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ पोस्ट करुन दसरा मेळाव्या संदर्भात आपल्या समर्थकांना खास आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, दसरा म्हणजे आपल्या स्वाभिमानाचा दिवस, आपल्या आवडीचा दिवस, आपल्या सर्वांच्या शक्ती आणि भक्तीच्या संगमाचा दिवस. आपण सर्वांनी दसऱ्याच्या तयारीला लागा आणि दसऱ्याच्या दिवशी मेळाव्यात भेटूया, असे आवाहन केले.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुंडेंचा दसरा मेळावा अतिशय साध्या पद्धतीने झाला होता. मात्र, यावर्षी परवानगी मिळाल्याने हा मेळावा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगावमध्ये मेळाव्याची मोठी तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी या तयारीचा एक व्हिडिओही शेअर केला होता.
21 सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडिओत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, 'कोरोनामुळे अधुरे राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या दिवसाच्या प्रतीक्षेत…तो दिवस आपला…एक अनोखा दिवस…कोणता दिवस, कोणते स्थळ, आणि निमित्त काय ???.. तुम्हाला तर माहीत आहेच…लागा तयारीला,' असे आवाहन पंकजा मुंडेंनी केले होते. दरम्यान, आजही एक व्हिडिओ पोस्ट करुन मेळाव्या संदर्भात आपल्या समर्थकांना खास आवाहन केले आहे.
हेही वाचलंत का ?