बीड, पुढारी वृत्तसेवा : मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे, मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनीसुद्धा मला संपवण्याचा प्रयत्न केला तर ते संपवू शकत नाहीत, कारण मी तुमच्या मनावर राज्य केले तर तसे ते करू शकणार नाहीत, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे आयोजित बुद्धिजिवींसोबत आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे, असे त्या म्हणाल्या. या वक् तव्यानंतर क्षणभर थांबून त्यांनी सांगितले, की मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही. पंकजा मुंडे यांचे वक् तव्य ग्रामपंचायत व अन्य निवडणुकांच्या अनुषंगाने पुढे आले. ग्रामंपचायत आणि इतर निवडणुका होत आहेत. आता या निवडणुका आपण वेगळ्या पद्धतीने लढवूयात. आपल्याला जात, पात, पैसा, प्रभाव याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे, असे त्या म्हणाल्या. राजकारणात आपल्याला स्वच्छता आणायची आहे. राजकारणात आपल्याला बदल करावे लागतील. राजकारणी तर गणेश मंडळ, नवरात्री, गरबा, नाटक, तमाशाचे आयोजन करतात. हे मोदी यांना अभिप्रेत नाही. आपण जुन्या पद्धतीप्रमाणे राजकारण करूया, असे आवाहन त्यांनी केले.