नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने यंदा 106 मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार जाहीर केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, 'ओआरएस'चे निर्माता दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासोबत तबलानवाज झाकीर हुसेन, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, श्रीनिवास वर्धन (अमेरिका) यांना 'पद्मविभूषण', विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्यासह 9 मान्यवरांना 'पद्मभूषण' आणि 91 मान्यवरांना 'पद्मश्री' पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. (Padma Awards 2023)
महाराष्ट्रातील कुमार मंगलम बिर्ला, कला क्षेत्रातील सुमन कल्याणपूर, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील दीपक धार यांना 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबत भिखू रामजी इदाते, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), परशुराम खुणे, प्रभाकर मांडे (साहित्य-शिक्षण), गजानन माने (समाजकार्य), रमेश पतंगे (साहित्य-शिक्षण) आणि कोमी वाडिया यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. (Padma Awards 2023)
कोण आहेत परशुराम खुणे?
विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे कलावंत परशुराम खुणे (गडचिरोली) यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करण्यात आला. खुणे यांनी 5 हजारांहून अधिक नाटकांमधे 800 पेक्षा जास्त अधिक भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे नक्षल प्रभावित भागातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य खुणे यांनी केले आहे. यासोबतच नक्षल प्रभावित भागात व्यसनमुक्ती, स्वच्छता तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे त्यांचे सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
अधिक वाचा :