राहू (ता. दौंड) येथील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संतोष जगताप याच्यावर भरदिवसा अज्ञात तिघा हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली. ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथे पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनाई येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात बचावासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
राहू येथे बेकायदा वाळू उपश्यावरुन २०११ मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर आहे. या प्रकरणात न्यायालयात जामीनावर संतोष जगताप बाहेर होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जगताप हा आपल्या साथीदारांसह उरुळी कांचन येथे तळवाडी चौकातील सोनाई हॉटेल येथे चहा घेऊन बाहेर पडला होता. त्याचवेळी वेरना कारमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी संतोष जगताप हा आपल्या वाहनात बसत असताना संतोषवर एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या घातल्या.
छातीवर, कमरेत व खुबा यांच्यात गोळ्या घुसल्याने संतोष गंभीर जखमी झाला. या हल्यात संतोष चा अंगरक्षक देखील गंभीर जखमी झाला होता. तर बचावासाठी हल्लेखोरावर केलेल्या गोळीबार एकावर गोळीबार झाला आहे. या हल्यानंतर संतोष जगताप याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी तो मयत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.