Dr D. Y. Patil birthday special : उलगडला सहा दशकांचा ऋणानुबंध, दोन पद्मश्री मित्रांचा रंगला दिलखुलास गप्पांचा फड | पुढारी

Dr D. Y. Patil birthday special : उलगडला सहा दशकांचा ऋणानुबंध, दोन पद्मश्री मित्रांचा रंगला दिलखुलास गप्पांचा फड

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत आपल्या अतुलनीय कामगिरीने यशाचे उत्तुंग शिखर गाठणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि महाराष्ट्रातील सामाजिक लढ्यांचे प्रेरणास्थान, माध्यम क्षेत्रातील मानदंड ठरलेले दुसरे पद्मश्री डॉ. बाळासाहेब ऊर्फ प्रतापसिंह जाधव यांनी एका सायंकाळी झालेल्या भेटीत आपल्या तब्बल सहा दशकांच्या ऋणानुबंधाला, महाराष्ट्राच्या शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रांच्या उभारणीतील घटना-प्रसंगांना उजाळा दिला. आठवणींचे पट उलगडत गेले. दोन जीवाचे मित्र भेटले... वयाच्या 86 व्या वर्षातही दिलखुलास डी. वाय. दादांनी आपल्या खडतर प्रवासातील आपल्या या जिवलग मित्रासोबतच्या अनेक आठवणी हृदयाच्या कुपीत जपल्या आहेत.

एखाद्या सामाजिक नेतृत्वाची कर्तबगारी असावी तर ती किती? साहित्य, कलेपासून राजकारण, शिक्षण, आध्यात्मासह व्यापक समाजकारणाचे ध्येय आणि त्याच्या पूर्तीसाठी अखंड धडपड, कष्ट… या जगावेगळ्या ध्यासाचे मोजमाप करायचेच झाले, तर त्यासाठी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा घ्यावा लागेल. सर्वसामान्य माणसासाठी राजकारण ही धारणा अंगी बाळगून राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना, सुमारे पंचवीस वर्षांचे लोकसेवेचे योगदान दिले असताना त्यांना एका अवचित प्रसंगाने शिक्षण क्षेत्राकडे ओढले. शिक्षण म्हणजे केवळ उभ्या राहिलेल्या दगड-वाळू-विटा-सिमेंटच्या इमारती न राहता त्यात त्यांनी जीव ओतला. ती खर्‍या अर्थाने ज्ञानमंदिरे बनवली. शिक्षण, गुणवत्ता आणि ज्ञानाची अजोड सांगड घातली.

नव्या भारताची नवी पिढी शिकून स्वावलंबी झाली पाहिजे…

नव्या भारताची नवी पिढी शिकून स्वावलंबी झाली पाहिजे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली पाहिजेत, या आग्रहाने आणि मूल्यनिष्ठेने त्यांनी शिक्षण संस्थांची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानाची, नवीनतेची सतत कास धरणारा आणि जगाला कवेत घेण्याची अचाट महत्त्वाकांक्षा असणारा हा ध्येयवेडा माणूस…पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील… सात अभिमत विद्यापीठे, शेकडो शिक्षण संस्था, हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आरोग्यव्यवस्थेचा पसारा उभा करणारे, केवळ मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करून आपले सामाजिक दायित्व पार पाडणारे, गरीब आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार उघडे ठेवणारे डॉ. डी. वाय. पाटील हे आज त्यांच्याच नावे चालवल्या जाणार्‍या संस्था, लाखो विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांनी तयार झालेल्या एकसंध ‘डीवाय’ परिवाराचे आधारवड आहेत.

आज 86 व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा. त्या उत्साहामागचे कारण त्यांनी उभारलेली माणसे, उभारलेले संसार आणि आयुष्यभरात मैत्रभावाने जोडलेली जीवाभावाची माणसे. हेच कृतार्थ जीवनाचे, समाधानाचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहतात. कुठे क्षणभरही अहंभावाचा दर्प नाही की, वृथा अभिमानाची छटा. सारे काही स्वच्छ, निर्मळ, तरल आणि प्रवाही…!

अनेक दिवसांपासून त्यांचे परममित्र पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी न झालेल्या भेटीमुळे आपसूक निर्माण झालेली ओढ… या ओढीतूनच पद्मश्री डॉ. जाधव यांनी डी.वाय. दादांना फोन केला. ‘कुठे आहात, भेटायचे आहे.’ दादा म्हणाले, ‘मी तळसंदेत आहे. मीच आपल्याकडे येतो.’ डी.वाय. दादांनी थेट ‘पुढारी भवन’ गाठले. मित्राच्या भेटीचा आनंद त्यांनाही लपवता आला नसावा. ते बोलून गेले, ‘मला वाटलं नव्हतं असे थेट इकडेच याल’. कोणाचाही आधार न घेता आपल्या सहकार्‍यांना ‘फक्त सोबत राहा’, असे सांगणारे 86 वर्षांचे उत्साही डी.वाय. दादा ‘पुढारी भवना’त आले. या सहृदयांत गप्पांचा फड रंगत गेला. सुमारे साठ वर्षांच्या सहप्रवासात आलेले अनेक दिग्गज, तितकेच प्रसंग आणि घटनांच्या उजाळ्याने ही दीड तासाची भेट मंतरली…

दिलखुलास हास्य, दाद-प्रतिसादात, मनमोकळ्या पण भारावलेल्या वातावरणात हे ‘मैत्र जीवाचे’ भेटले. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांचीही उपस्थिती तीन पिढ्यांचे बंध जोडून गेली. या दोघांतील ऋणानुबंध त्यांच्या परिवारातील मोजक्याच व्यक्तींना माहिती आहेत; पण गेली साठेक वर्षे त्यांनी ते जाणिवेने जपले. डी.वाय. दादा तसे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव (आबा) यांचे जवळचे कार्यकर्ते; पण ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डी.वाय. दादांचा पिंड एकच. दोघेही डी.वाय. शैक्षणिक परिवारातील अनेक संस्थांच्या उभारणीत खांद्याला खांदा लावून काम केलेले. दोघांनी मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी मुंबई, दिल्लीच्या अनेक फेर्‍या मारल्या.

शिक्षण असो राजकारण, व्यक्तिगत आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय, त्या प्रत्येक ठिकाणी पद्मश्री डॉ. जाधव त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. दोघेही एकमेकांच्या कुटुंबांसाठी हक्काचे वडीलधारी आहेत. ‘पुढारी’चे संपादक म्हणून डॉ. जाधव यांची प्रतिमा, समाजकारणावरील त्यांची पकड आणि राजकारण्यांवरील दरारा यामुळे जिवलग मित्र या नात्याने त्यांनी पावलोपावली डी.वाय. दादांना साथ दिली. राजकारण, प्रशासन, आरोग्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी त्यांचा संपर्क आला. तसे डी.वाय. दादा आणि श्रीपतराव बोंद्रे हे दोघेही पद्मश्री ग. गो. जाधव (आबा) यांचे कार्यकर्ते. आबा आणि डी.वाय. दादांमध्ये तीस वर्षांचे अंतर, तर पद्मश्री डॉ. जाधव यांच्यापेक्षा डी.वाय. दादा दहा वर्षांनी मोठे.

आबांनी (पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव) 1957-62 या काळात डी. वाय. दादा यांना कसबा बावड्यातून कोल्हापूर नगरपालिकेवर निवडून आणले. राजकारणाची ती त्यांची पहिली पायरी. पुढे 1967 मध्ये पन्हाळा-बावडा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. त्यांच्यावर पद्मश्री ग. गो. जाधव यांचा मोठा जीव. अनेकदा ते भेटत आणि राजकारण-समाजकारणावर आबांचे मार्गदर्शन घेत. आबांनी डी. वाय. दादा आणि श्रीपतराव बोंद्रे यांना बोट धरून राजकारणात आणले… बाळासाहेब यांनी मला वेळोवेळी मदत केली आहे, असे सांगताना डी. वाय. दादा आठवणींना उजाळा देत म्हणाले, माझे मित्र संचेती यांच्यासह मी माझी मुंबईची मुलगी प्रिया हिच्या नावाने प्रिया ऑईल ही कंपनी काढली होती; पण पैसे कमी पडत होते. पण, 40 वर्षांपूर्वी बाळासाहेब यांनी 20 लाखांची मदत केली. प्रत्येक अडचणीत बाळासाहेब मला सहकार्य करीत आले आहेत’.
………………………….

बहुजन समाजातील कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत

डी.वाय. दादा सांगत होते… बहुजन समाजातील कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत, ही आबांची (पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव) तळमळ. आबांनीच मला आणि श्रीपतराव बोंद्रे यांना राजकारणात घडवले, भविष्याची आव्हाने पेलण्यासाठी सज्ज केले. मग, महापालिकेवर दोघांनाही कसबा बावडा आणि फुलेवाडीतून पाठवण्याचा विषय असो, वा राजकारणात उभे करण्याचा असो. दोघांनाही आबांनी आमदार केले. माझ्यासाठी पन्हाळा-बावड्यातून उमेदवारी आणली. बाहेरचे उमेदवार म्हणून स्थानिक आमदार सावंत यांच्यामुळे विरोध होता. मात्र, आबांनी स्वत: तेथे गावसभा घेऊन ‘मी निवडणुकीला उभा आहे असे समजा आणि डी.वाय.ना निवडून द्या,’ अशी साद घातली. मी आमदार झालो. मला मौनी विद्यापीठात आणण्यामागेही आबाच होते. आबा, व्ही. टी. पाटील आणि जे. पी. नाईक यांची घट्ट मैत्री. त्यातूनच मला मौनी विद्यापीठात पाठवण्याचा निर्णय झाला. ही जबाबदारी सतरा-अठरा वर्षे खंबीरपणे पेलली. शिक्षण क्षेत्रातील माझ्या कामाचा श्रीगणेशा तेथेच झाला.
……………………………

चर्चेत सकाळच्या खरेदी प्रकरणाच्या विषयालाही उजाळा मिळाला. ‘सकाळ’च्या लीलाताई परुळेकर आणि शरद पवार यांच्यात त्या काळात ‘सकाळ पेपर्स’च्या शेअर्स खरेदीवरून हायकोर्टात केस सुरू होती. पवार यांनी शेअर्स परत द्यावेत, त्याची रक्कम लीलाताई परुळेकर यांनी भरावी, असा निकाल कोर्टाने दिला. लीलाताईंनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि हे शेअर्स विकत घेण्याची विनंती केली. डॉ. जाधव यांनी शेअर्स रकमेचा कोर्टाच्या नावे डीडी काढला. त्यावेळच्या डीडीवरील युनायटेड वेस्टर्न बँकेच्या नावावरून शरद पवार यांनी डॉ. जाधव शेअर्स घेत असल्याची माहिती काढली. शरद पवार यांनी बाळासाहेब यांना सकाळी फोन केला. भेटायचे आहे असे कळवले.

मुंबईत ताडदेवच्या फ्लॅटवर ते रात्री बाळासाहेब यांना जाऊन भेटले. ‘सकाळ’चे शेअर्स विकत घेण्यासाठी काढलेला डीडी परत घेण्याची विनंती पवार यांनी बाळासाहेब यांना केली. या व्यवहारात डी. वाय. पाटीलही असल्याचे बाळासाहेब यांनी पवार यांना सांगितले. तेथून बाळासाहेब आणि शरद पवार चर्चेसाठी डी.वाय. दादांकडे हाजी अलीत दादांच्या फ्लॅटवर गेले. ज्येष्ठ नेते शामराव भिवाजी पाटीलही तेथे होते. पहाटे चारपर्यंत चर्चा झाली. शरद पवार व डी. वाय. पाटील यांच्या मैत्रीखातर आणि विनंतीवरून बाळासाहेब यांनी डी. वाय. पाटील यांना दोन मेडिकल कॉलेज देण्याच्या अटीवर डीडी परत घेण्याचे मान्य केले. बाळासाहेब जाधव यांनी शरद पवार यांच्याकडून तसा शब्द घेतला. त्यानंतर ‘सकाळ पेपर्स’चे शेअर्स विकत घेण्यासाठी काढलेला डीडी मागे घेतला. त्यामुळे ‘सकाळ’वर पवार यांची मालकी झाली.

पुढे पवार यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या आग्रहामुळे डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरचे मेडिकल कॉलेजही मंजूर केले. नंतर बाळासाहेब यांच्याच पाठपुराव्याने मुंबईचे मेडिकल कॉलेजही त्यांनी मिळवले. ‘पुढारी’ भवनात झालेल्या दोघांच्या या भेटीत हे सारे संदर्भ उलगडत गेले. डॉ. डी. वाय. दादा अनेक आठवणी सांगत होते. बाळासाहेब जाधव त्यात भर घालत होते. विशेष म्हणजे, डॉ. जाधव यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या या दोन मेडिकल कॉलेजच्या मंजुरीनंतर डी. वाय. पाटील ग्रुपचा शैक्षणिक वटवृक्ष विस्तारत गेला. ती पायाभरणी होती.
…………………………….

बाळासाहेब दादांबद्दल भरभरून सांगत होते… दादा त्यावर चेहर्‍यावरच्या हसर्‍या छटांनी दाद देत होतेे… मध्ये-मध्ये आठवणींचे किनारे जोडत होते… दादा म्हणाले, शिक्षण क्षेत्रात काहीतरी भरीव काम केले पाहिजे, याचे खरे संस्कार आपल्यावर मौनी विद्यापीठात झाले.
आबांनी (पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव) आणि व्ही. टी. पाटील यांनी मौनी विद्यापीठात आणले. त्याआधी त्याला निमित्त झाले त्यांचे गुरुवर्य महादबा पाटील महाराजांचे. एके दिवशी दादा महादबा पाटील महाराजांना घेऊन शेगावला गेलो. सद्गुरू गजानन महाराजांच्या पावन भूमीत पाटील महाराजांच्या मुखातून दिव्य प्रेरणा झाल्याप्रमाणे वाणी निघाली. ते मला म्हणाले, ‘…सोडून दे ते राजकारण, शिक्षण क्षेत्रात कार्यास आरंभ कर. यशस्वी होशील.’ गुरुवर्य पाटील महाराजांनी दिलेला तो आशीर्वाद आणि आशीर्वचन. पुढे गोष्टीही तशा घडत गेल्या.
………………………..

वसंतरावदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. डी. वाय. दादा राजारामबापूंचे कार्यकर्ते. ते वसंतदादांकडे जात नसत; मात्र बाळासाहेब यांचे वसंतदादांशी घनिष्ठ संबंध. बाळासाहेब व डी. वाय. दादा एकदा वसंतदादांना भेटले. विनाअनुदान तत्त्वावर महाराष्ट्रात अभियांत्रिकी कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय वसंतदादांनी त्या काळात घेतला होता. शिक्षणाची दारे बहुजन समाजासाठी उघडली गेली. सर्वसामान्य कार्यकर्त्याला वसंतदादांनी कधी डावलले नाही. आपण राजकारण सोडल्याचे आणि आता शैक्षणिक कार्यात उतरल्याचे डी.वाय. दादांनी वसंतदादांना सांगितले. त्यांचा निर्धार पाहून वसंतदादांनी त्यांच्या पाठीशी राहायचे ठरवले.

नवी मुंबईत इंजिनिअरिंग कॉलेजच्या मंजुरीच्या फाईलवर दादांनी सही केली. या भेटीनंतर डी. वाय. दादांनी नव्या शैक्षणिक कार्याची भक्कम पायाभरणी केली. सात अभिमत विद्यापीठे आणि 165 शाळा-महाविद्यालये, शिकून बाहेर पडलेले लाखो विद्यार्थी आणि 12 हजार शिक्षक-कर्मचार्‍यांनी शिक्षणाचा हा ‘वेलू गगनावरी गेला’ आहे. हे शिक्षणाचे अवाढव्य विश्व आपल्या कर्तृत्वाने त्यांनी उभे केले. डी.वाय. दादांच्या जीवनास कलाटणी देणारा हा प्रसंग या चर्चेत निघाला. हे दोघेही त्याचे शिल्पकार. एका भूतकाळातील आठवणीला उजाळा देण्यात आला.
………………..

दादांच्या दीर्घायुष्याचे आणि ठणठणीत प्रकृतीचे रहस्य काय, असा विषयही गप्पांच्या ओघात निघाला. डी. वाय. दादा आणि पद्मश्री डॉ. जाधव यांनी ते उलगडले. डी. वाय. दादांच्या पैलवानकीपासून आजच्या दैनंदिनीपर्यंत सारे विषय निघाले. ‘जीवनशैलीत आमूलाग्र बदल’ हेच दीर्घायुष्याचे कारण, पद्मश्री डॉ. जाधव सांगत गेले… दादांनी पहिले काम केले ते वजन कमी करण्याचे. वाढत्या वजनामुळे, स्थुलतेमुळे हालचालींवर मर्यादा येत. अनेक ठिकाणी व्हीलचेअरमधून न्यावे लागे. बलदंड, धष्टपुष्ट देहयष्टीच्या दादांनी वजन घटवायचा निर्धारच केला. भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या आतड्याची शस्त्रक्रिया करवून घेतली. त्यामुळे साहजिकच खाण्यावर नियंत्रण आले. खाण्याच्या सवयीच त्यांनी बदलून टाकल्या. त्यांचा रोजचा आहार ऐकून थक्कव्हायला होते.

पोह्याचा हलका नाश्ता, नारळ पाणी, ड्रायफ्रूट्स, उकडलेला भाजीपाला आणि उकडलेले मासे हाच त्यांचा दैनंदिन आहार. दररोज सात किलोमीटर पाण्यात पाय राहतील अशारीतीने सकाळी 7 ते 9 असे दोन तास चालणे, पोहणे, सोबत थोडा व्यायाम, योग यातून त्यांनी वजनावर नियंत्रण मिळवलेच शिवाय तब्येतही सुद़ृढ ठेवण्यात कमालीचे यश मिळवले. वजन 112 किलोवरून 70 किलोवर घटवले. कोणाच्याही आधाराशिवाय ते चालतात. ते सांगतात….थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे वचन मी अंगीकारले…‘इट टू लाईव्ह, नॉट लाईव्ह फॉर इटिंग’…जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका. ह्दयावर सात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया होऊनही डीवाय दादांची प्रकृती उत्तम आहे.

… प्रकृतीच्या रहस्याचे गमक उलगडत असताना पुन्हा दोघेही गतकाळातील आठवणींत रमले. ‘आजही मी उसाचा रस घेतलाय’, असे दादांनी सांगताच दोघेही खळखळून हसले. त्यांच्या खवय्येगिरीचे चटकदार किस्से निघत गेले. पद्मश्री डॉ. जाधव सांगत होते… दादा एकेकाळचे पट्टीचे खवय्ये. मटण त्यांना भारी प्रिय… एकावेळी किलोभर मटण आणि भांडेभर तांबडा रस्सा त्यांना लागे. एकदा सातार्‍यात प्रतापसिंह महाराजांकडे आम्ही जेवणासाठी त्यांच्या निमंत्रणावरून थांबलो. तिथेही मटणाचा बेत. मग आम्ही आडवा हात मारलाच.

महाराजांच्या अदालत वाड्यात डीवाय दादांनी वाघाची कातडी बघितली. ती मिळाली तर बरे होईल, म्हणाले. डॉ. जाधव यांनी महाराजांना सांगितले. महाराजांनी आपल्या माणसांना सूचना देऊन वाघांची दोन कातडी डीवाय दादांना भेट दिली…डीवाय दादांनी भाजलेल्या कणसांची आठवण सांगितली…एकदा आम्ही मुंबईस निघालो होतो. वाटेत मक्याची कणसे भाजणारा दिसला. दादांनी गाडी थांवबली. एकावेळी पंधरा-वीस कणसे घेतली आणि त्याचा बघता-बघता फडशाही पाडला!
…………….

डीवाय दादा घरगुती आणि कौटुंबिक जीवनाच्या आठवणीत रमले…बाळासाहेब (डॉ. जाधव) आमच्या घरातील प्रत्येक कार्यात आमच्या सोबत असत. बाळासाहेबांना (डॉ. जाधव) लग्नासाठी मुली बघायला मी नेहमी बरोबर असे. एकदा आम्ही पुण्यातून आमचे मित्र डॉ. भावे यांच्या खाजगी विमानातून आम्ही तिघे मुंबईला गेलो. मुलगी पसंत पडली. (सौभाग्यवती गीतादेवी-वहिनीसाहेब). लग्नसमारंभासाठी वसंतदादा आणि शंकरराव चव्हाण यांना खास विमानाने घेऊन मी आलो होतो. या मैत्रीचे रूपांतर पुढे कौटुंबिक नातेसंबंधात झाले. माझ्या आजारपणात बाळासाहेब बरोबर राहिलेत. पहिली अँजिओप्लास्टी ह्यूस्टनला झाली. ते मला विमानतळावर सोडायला आले. त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वासातूनच पुढे मुंबईत आम्ही बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. बी.के. गोयल यांच्याकडे पुढील उपचार आणि शस्त्रक्रिया करून घेतल्या.
……………..

डीवाय दादांची पुढची पिढीही कर्तृत्ववान निघाली आहे. स्वत: दादा त्याचा कृतार्थतेने आणि समाधानाने आवर्जून उल्लेख करतात. सौभाग्यवती शांतादेवी पाटील यांनी मोलाची साथ दिल्याचे सांगतात, चिरंजीव संजय, सतेज यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारणात मोठे काम सुरू केले आहे. डी. वाय. ग्रुपचा पसारा संजय सांभाळत आहेत. सतेज यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे. सौ. भाग्यश्री प्रसाद पाटील (डॉ. पी.डी. पाटील यांच्या सौभाग्यवती), सौ. मंगलताई प्रताप पाटील आणि सौ. राजश्री मेघराज काकडे याही आपापल्या क्षेत्रात उभ्या राहिल्या आहेत. नातू ऋतुराजही राजकारणात आहे, आमदार आहे हे सांगताना कौटुंबिक आठवणींना उजाळा देतात. “दादा पणतूला पाहण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे, तुम्ही नशीबवान आहात”, डॉ. जाधव यांच्या या वाक्यावर डीवाय दादा प्रसन्नपणे हसतात. जावई डॉ. पी. डी. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख ते आवर्जून करतात. विशेषत: त्यांच्या लोभस व्यक्तिमत्तवाबद्दल मनमोकळेपणाने बोलतात.

सर्वांहून ते मोठे कतृत्ववान निघाले. जावईपणाची उंची त्यांनी उभ्या केलेल्या सार्वजनिक कामातून वाढवली आहे, असे अभिमानाने सांगतात. दुसर्‍या सौभाग्यवती पुष्पलता, आणि पूत्र डॉ. विजय, डॉ. अजिंक्य, अन्या डॉ. नंदिता प्रदीप पालशेतकर, डॉ. प्रियदर्शनी रश्मीन कोलेरा यांच्या कामाबद्दलही ते आवर्जून सांगतात. त्यांचा व्यापही मोठा आहे, असे ते म्हणतात.

समाजकारण, राजकारण करताना तसेच त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना वेगवेगळ्या निमित्ताने देशभर हिंडलो. धडपडणारी माणसे, त्यांचं काम, त्यामागची प्रेरणा समजून घेण्याचा प्रयत्न केला, डीवाय दादा सांगत होते. जीवन जगणे ही एक कला आहे, असे सांगणारे आणि प्रारब्ध हे काही आकाशातून पडत नाही, ते आपल्या कर्मातून साकारत असते, हे सांगणारे डीवाय दादा एका विशाल वटवृक्षाचे खर्‍या अर्थाने आधारवड आहेत.

हजारो कुटुंबांच्या जीवनाचा परिसस्पर्श ठरलेल्या आणि त्यांच्या जीवनात सुखाचे मळे फुलवणार्‍या पद्मश्री डॉ. डी. वाय. दादांना वाढदिवस आणि दीर्घायुरोग्यासाठी पद्मश्री डॉ जाधव आणि डॉ. योगेश जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. अभिष्टचिंतन केले. मी शंभरी पार करणार, असा निर्धार आणि विश्वास डॉ. डीवाय. दादांनी व्यक्त केला त्यावेळी त्यांच्या जीवननिष्ठेच्या धड्याचे आणखी एक पान उलगडले.

(दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी दोन पद्मश्री मित्रांच्या दिलखुलास गप्पांतील टिपलेल्या काही मर्मबंधातील आठवणी.)

Back to top button