आडुळ; पुढारी वृत्तसेवा : दोन दुचाकीची समोरासमोर धडक होवून एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी ( दि.२२) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आडुळ खुर्द ( ता. पैठण) शिवारात घडली. नंदकिशोर शंकरदास वैष्णव (वय ४५ वर्षे, राहणार होणोबाचीवाडी ता. पैठण) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
संबंधित बातम्या
आसेफ अब्दुलरहेमान शेख ( वय ४० वर्षे) व त्यांचा पुतण्या आदनान एजाज शेख ( वय २२ वर्षे) दोघे राहणार आडुळ बु. ( ता. पैठण ) हे रविवारी रात्री दुचाकीने (क्रमांक एमएच २० एफ जे ५५६०) त्यांच्या आडुळ खुर्द शिवारातील शेतात जात होते. तर आडुळ फाट्याकडून आडुळकडे नंदकिशोर वैष्णव हे दुचाकीने ( क्रमांक एमएच २० सी डी ९०२५) येत होते. दरम्यान आडुळ खुर्द शिवाराजवळील एका खड्याला चुकविण्याच्या पर्यंत्नात असताना दोघांच्या दुचाकी एकमेंकाना धडकल्या. या अपघातात नंदकिशोर वैष्णव व आदनान शेख हे गंभीर जखमी झाले होते.
अपघाताची माहिती समजताच आडुळ खुर्द व आडुळ बुद्रुक येथील नागरीकांनी मदतकार्य करुन जखमींना मदतकार्य करीत उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविले. मात्र नंदकिशोर वैष्णव यांचा रस्त्याच मृत्यू झाला. तर आदनान शेख याच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात झाली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र क्षिरसागर, श्री. दुलत करीत आहेत.
आडुळ फाटा ते आडुळ गावापर्यंत करण्यात आलेल्या नविन डांबरीकरणानंतर येथे भले मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावरून दररोज ये- जा करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने येथे अपघात होत आहेत. झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. तर या खड्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.