माणगंगा साखर कारखाना ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार : तानाजीराव पाटील | पुढारी

माणगंगा साखर कारखाना ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार : तानाजीराव पाटील

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा: माणगंगा साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करेल अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या 

माणगंगा कारखान्याच्या २०२३-२४ च्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी ते बोलत होते. विठ्ठल मोरे, हरिदास येडगे या शेतकऱ्यांनी सपत्नीक बॉयलर पूजन केले. यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन ब्रम्हदेव होनमाने, बाजार समिती सभापती संतोष पुजारी, उपसभापती राहुल गायकवाड, शिवाजीराव पाटील, अप्पासाहेब काळेबाग, डी. एम. पाटील आणि सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तानाजीराव पाटील म्हणाले, विरोधक मदतीचा हात देण्याऐवजी अडथळे आणत आहेत. त्यावर मात करून सर्वांच्या सहकार्याने पाच वर्षे बंद पडलेला कारखाना अवघ्या तीन महिन्यात सुरू होत आहे. कामगार आणि शेतकरी यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसतो आहे. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ११००० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. हे विश्वासाचे प्रतीक आहे. वाहनांचे करार झाले असून उसाचे नियोजन केले आहे. ऊस घातल्यावर उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत रोखीने बिल दिले जाईल. माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

कामगारांचे पगार नियमित करण्याचे नियोजन केले आहे. सभासदांनी शेअर्स रकमेची पूर्तता करावी आणि आपल्या कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी एम. डी. नामदेव मोटे, शेती अधिकारी सुनिल शिरकांडे, जनरल मॅनेजर सुखदेव औताडे उपस्थित होते. प्रा. साहेबराव काळेबाग यांनी आभार मानले.

Back to top button